५० ट्रॅप कॅमेरे, पाच पिंजरे, शंभर वनकर्मचारी…अखेर वाघीण अडकलीच!
अनिल ठाकरे | चंद्रपूर : सावली तालुक्यात एका वाघिणीने धुमाकूळ घालून आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला होता. तालुक्यातील बोरमाळा, चेक विरखल आणि वाघोलीबुटी या परिसरात धुमाकूळ घालून बळी घेणाऱ्या वाघिणीला वन विभागाच्या शार्प शुटरनी अखेर जेरबंद केले. सावलीत आज दुपारच्या सुमारास वन विभागाला वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले. या वाघिणीला लवकरच नागपुरातील गोरेवाडा प्रकल्पात पाठविण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी ५० ट्रॅप कॅमेरे, पाच पिंजरे आणि शंभर वनकर्मचारी तैनात करण्यात आले होते. सावली तालुक्यात या वाघिणीने धुमाकूळ घालून आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे.
३० मार्चला बोरमाळा येथील हर्षल काळमेघे हा चार वर्षीय बालक घराशेजारी शौचाला बसला होता. तेव्हाच वाघिणीले त्याला उचलून नेत ठार केले. १८ एप्रिल रोजी चेक विरखल येथील मंदाबाई सिडाम या महिलेवरही हल्ला करून ठार केले. २६ एप्रिल रोजी ममता बोदलकर या वृद्ध महिलेस ठार केले. या घटना ताज्या असतानाच उपवन क्षेत्र व्याहाडखुर्द अंतर्गत वाघोलीवडी येथील प्रेमिला रोहनकर हिच्यावरही वाघाने हल्ला केला. सातत्याने वाघाचे हल्ले वाढत असल्याने संतप्त नागरिकांनी मृतदेह न उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याच्या मार्गावर होती.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इशारा देत ग्रामस्थांनी वाघाला ठार केले तर त्यांना अटक करू नका असे कडक शब्दात ठणकावले होते. तेव्हापासूनच वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या नेतृत्वात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे, शुटर मराठे व वन विभागाचे इतर कर्मचारी सातत्याने वाघिणीच्या मार्गावर होते. आज दुपारी खोब्रागडे यांनी वाघिणीला सावलीच्या जंगलात बेशुध्दीचे इंजेक्शन दिले. वाघिणीला सध्या सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात ठेवण्यात आले आहे. तिथून नागपूरच्या गोरेवाडा प्रकल्पात पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांनी दिली.