पुणे : कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. १० दिवस मनोभावे बाप्पाची सेवा करून आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. परंतु, या गणेश विसर्जन मिरवणुकीस राजकीय किनार प्राप्त झाली आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे.
ठाकरे सरकारला पायउतार करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे. अशात भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज समोरासमोर आले.
गर्दीतून रस्ता काढत आदित्य ठाकरे मानाचा पहिला गणपती कसबा पेठ येथे पोहोचले. येथे त्यांची सर्व वाट पाहत होते. यानंतर कसबा गणपतीची आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी राजकीय भेदाभेद बाजूला सारुन आदित्य ठाकरे आणि चंद्रकात पाटील यांनी पालखीला एकत्रित खांदा दिला