'४० आमदारांनी राजीनामा द्यावा मीही देईन, होऊनच जाऊ दे एकदा'

'४० आमदारांनी राजीनामा द्यावा मीही देईन, होऊनच जाऊ दे एकदा'

आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाच्या आमदारांना आव्हान

मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आजही शिंदे गट आणि भाजप विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असून शिवसेना नेते आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. यावरुन आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली आहे.जी चित्र घेऊन ते उभे होते त्यांच्या घरातले संस्कार दिसून येतात. आम्हाला शिव्या दिल्यावर मंत्रीपदं मिळतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, गळ्यात पोस्टर लावून त्यांना कसं उभं केलंय. एका मंत्रीपदासाठी या गद्दार सरकारमध्ये किती काय करायला लागतं. मला खरोखर यांची कीव येते. यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले असते, तर आधी गद्दारी केली नसती आणि असे बिचाऱ्यासारखे उभे राहिले नसते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

या लोकांना आम्ही कमी काय केलं? ४० वर्षांत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी खाती सोडली नसतील, अशी खाती या लोकांना आम्ही दिली. आम्ही त्यांना सर्वकाही दिलं. आमच्याच पाठीत खंजीर खुपसून आज ते पायऱ्यांवर उभे आहेत. या ४० लोकांसोबत विश्वासघात झाला आहे. त्यांना काय काय गळ्यात घालून आमच्यासाठी उभं केलं आहे. आम्हाला शिव्या दिल्यावर मंत्रीपदं मिळतील हे आजचं चित्र आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

ज्यांनी हे बॅनर्स गळ्यात घातले आहेत, त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न या संदर्भात जर पायऱ्यांवर उभे असते तर मला कौतुक वाटलं असतं. जी चित्र घेऊन ते उभे होते त्यांच्या घरातले संस्कार दिसून येतात, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला सुनावले आहे.

तसेच, या ४० लोकांनी राजीनामा द्यावा, मीही देईन. आपण निवडणुका लढवू. संपूर्ण विधानसभाच बरखास्त करा व महाराष्ट्रात निवडणुका लावा. होऊन जाऊ दे एकदाचं, असेही खुले आव्हानही आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना दिले आहे.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी आज आंदोलन करत आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी आमदारांनी हातात धरलेल्या पोस्टरवर आदित्य ठाकरे यांचे व्यंगचित्र असून महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज व युवराजांची कायमच दिशा चुकली असे लिहित एकिकडे हिंदुत्व आणि दुसरीकडे महाविकास आघाडी, असा उल्लेख आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com