टँकर घेऊन पाणी मारायचं हे हास्यास्पद; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुंबई : राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. यात पाण्याची फवारणी करण्याकरीता १००० टॅंकर्स लावावेत त्यासाठी विशेथ पथक नियुक्त करावे. अण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. यावरुन आता आदित्य ठाकरे यांनी सरकारवर घणाघात केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मी पर्यावरण मंत्री राहिलो आहे. टँकर घेऊन पाणी मारायचं हे हास्यास्पद आहे. तुमच्या मित्र पक्षाकडून काही तरी शिकावं. कॉन्ट्रॅक्ट ड्रीवन रिस्पॉन्स मुख्यमंत्र्यांकडून या सगळ्या प्रदूषणावर दिला जातो. आम्ही प्रदूषणवर खूप काम केले आहे. मात्र, आता पर्यावरण मंत्री आहेत का? कोणत्याही प्रकारचे उत्तर पर्यावरण खात्याकडून येत नाही. हे सर्व कन्स्ट्रक्शनमुळे झालेले आहे. बिल्डरच्या साईडवरुन प्रदूषण होत आहे. सार्वजनिक कामे थांबवण्याऐवजी तुमची बिल्डरची काम थांबवा, असे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, प्रदूषणाबाबत जी कारणे देत आहेत ते सगळे खोटं आहे. मुंबईत सुरु असलेले बांधकामाच्या कामांमुळे प्रदूषण होत आहे. यासाठी जे नियोजन केले जाते ते होत नाही आहे. मुंबईत अनेक ठिकाणी काम सुरु आहेत तिकडे कुठे तुम्हाला हिरवे पडदे दिसत आहेत, स्प्रिंकलर दिसत आहेत का? या मुंबईत पालकमंत्री जर बिल्डर असतील तर काय फायदा, असा टोला त्यांनी मंगल प्रभात लोढा यांना लगावला. तसेच, आता मुख्यमंत्री म्हणाले स्मॉग टॉवर घ्यायचे. यासाठी ३० कोटीपेक्षा जास्त खर्च आहे आणि स्मॉग टॉवर लावून जनतेला काही फायदा होणार नाही, असेही आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे.
दरम्यान, सिद्धीविनायक मंदिर न्यासच्या अध्यक्ष पदावर सदा सरवणकर यांची निवड झाली आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मंदिर न्यासचा अध्यक्ष ज्या आमदारांना केलाय त्यांनी बंदूक गणेशोत्सव मिरवणुकीत काढली होती, फायरिंग केलं होते. आता या आमदारांना अध्यक्ष केल्यावर भाविक कसे सुरक्षित असतील. दुसरे जनरल डायर हे सिद्धिविनायक ट्रस्टवर बसविले आहे, असा जोरदार निशाणा त्यांनी साधला आहे.