अजित पवारांना नेमका किती आमदारांचा पाठिंबा? 5 जुलैला होणार स्पष्ट
मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. असे असले तरी अजित पवारांना किती आमदारांचा पाठिंबा आहे हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. अशातच, एक महत्वाची बातमी समोर येत आहे. 5 जुलै रोजी अजित पवार आणि शरद पवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठक बोलवली आहे. या बैठकीनंतर पाठिंब्याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या शपथविधीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीबाबत माहिती दिली होती. कोणतीही माहिती न देता काही कागदांवर स्वाक्षरी केली असल्याचे काही आमदारांनी म्हटलं असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. पक्षात झालेल्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जुलै रोजी तालुका अध्यक्ष, राज्य कार्यकारणीची बैठक बोलावली असून शरद पवार हे सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. ही बैठक वाय.बी. सेंटरवर बोलविण्यात आली आहे
तर, अजित पवारांनी 5 जुलै रोजीच भुजबळ नॉलेज सिटीमध्ये राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीला काल शपथ घेतलेले मंत्री आणि ज्यांनी सह्या केल्या नाहीत ते आमदार आणि खासदार बैठकीला येणार असल्याचे समजत आहे. या बैठकीत मागील बंडाप्रमाणे हे फसू नये म्हणून या आमदारांना विश्वासात घेतलं जाणार असल्याचे सांगितले जातंय. तसेच, आपली पुढची भूमिका काय याविषयी अजित पवार मार्गदर्शन करतील. या बैठकीनंतर अजित पवारांसोबत नक्की किती आमदार, खासदार आहेत हे बैठकीनंतर स्पष्ट होणार आहेत.