ज्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय, त्यांनी...: अजित पवार
मुंबई : सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम थांबायला तयार नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा मोर्चा राजकीय पक्षाशी निगडित नसल्याने या महामोर्चाला राज्यातील सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. आज महामोर्चाच्या आढाव्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे पार पडली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महापुरुषांचा सतत केला जाणारा अपमान, सीमा प्रश्न व महागाई, बेरोजगारी हे सर्व प्रश्न घेऊन सत्ताधारी लोकांचा धिक्कार करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि जनताही मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही. परंतु, स्वाभिमान दुखावला गेला आहे असेही लोकं सहभागी होतील, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
अत्यंत समंजस भूमिका सर्व पक्षांनी घेतली आहे. अनेक राजकीय पक्ष त्यात सहभागी झाले आहेत. ज्या-ज्या वेळी बैठका घेण्यात आल्या त्या-त्या वेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. आजच्या बैठकीत मोर्चाचा आढावा घेण्यात आला. तिथे शिस्त राहिली पाहिजे. तिथे कुठेही काहीही विध्वंसक होणार नाही. अतिशय शांततेच्या मार्गाने लोकशाहीत आपले मत प्रदर्शित करताना मोर्चा काढतो. त्याचपध्दतीने हा मोर्चा काढणार आहोत, असेही अजित पवार म्हणाले.
आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विनियोजन बिलासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत घेतलेल्या बैठकीबाबत काय ठरले,त्या बैठकीतून काय मार्ग निघाला याची विचारणा केली त्यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांनी शांतता ठेवावी. महाराष्ट्रातून तीन मंत्री आणि कर्नाटकचे तीन मंत्री अशी सहा लोकप्रतिनिधींची समिती राहिल आणि अधिकार्यांची एक समिती राहणार आहे. कर्नाटकची बाजू सुप्रीम कोर्टात ॲड. रोहतगी मांडणार आहेत हे समजल्यावर आम्ही ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांना महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी अशी मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात दिले व मुख्यमंत्री यांनाही पत्र दिले आहे, असे सांगितले.