गोपीचंद पडळकरांविरोधात अजित पवार गट आक्रमक; चोप देण्याचा इशारा
पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली होती. अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू, असा उल्लेख पडळकर यांनी उल्लेख केला होता. यावरुन आता अजित पवार गट आक्रमक झाला असून पडळकरांविरोधात जोडे मारो आंदोलन सुरु केले आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पुण्यात अजित पवार गट आक्रमक झाला असून पुण्यात आज बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा अजित पवार गटाने निषेध केला आहे. त्यांच्या फोटोला जोडे मारून राष्ट्रवादी काँग्रेसने पडळकर यांना पुण्यात आल्यावर अशाच प्रकारे चोप देण्याचा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळेत गोपीचंद पडळकर यांना समज द्यावी, अशी मागणीही राष्ट्रवादीने केली आहे.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही धनगर आरक्षणाबाबत पत्र दिलं आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हंटले होते.