शरद पवारांच्या बैठकीत काय चर्चा झाली? पटेलांनी सांगितलं
मुंबई : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर रविवारी पहिल्यांदाच बंडखोर मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. यानंतर आता आज अजित पवारांसह सर्व आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमध्ये काय चर्चा झाली याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवारांसह सर्व आमदार शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी वाय. बी. चव्हाण सेंटरला आलो होतो. काल रविवार असल्यामुळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यामुळे बरेच आमदार आज हजर आहेत. यामुळे आमदारांना शरद पवारांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही येथे आलो आहे.
शरद पवार वाय. बी. चव्हाण सेंटरला दुपारी येणार असल्याची माहिती मिळाली. व आम्ही सर्व आमदारांसोबत शरद पवारांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच, पक्ष एकसंध राहण्यासंदर्भात आम्ही शरद पवारांना विनंती केली असल्याचेही पटेलांनी सांगितले. शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं.परंतु, कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे आता या भेटीगाठी नेमक्या कशासाठी आहेत? यामधून कोणते राजकीय निर्णय होतात का? शरद पवार यावर नेमका काय निर्णय घेतात. हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे. या भेटीमुळे बंडावर तोडगा निघतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.