राज्यात कंत्राटी भरती; अजित पवार म्हणाले, विरोधकांना उकळ्या फुटून...

राज्यात शासकीय भरती रखडलेली असताना आता राज्य सरकारनं कंत्राटी कामगारांच्या भरतीचा जीआर काढला आहे. यावरुन विरोधकांनी सरकारला घेरले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : काही दिवसांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपाची भरती करत असल्याची वस्तुस्थिती सांगितली. मात्र, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. त्यामुळे आमच्यावर कोण टिकाटिप्पणी करत आहेत, त्यांच्यावर राज्यातील तरुण-तरुणींनो विश्वास ठेवू नका. आम्ही दीड लाख पदांची भरती करत आहोत, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील तरुण-तरुणींना दिला. १ लाख ५० हजार तरुण-तरुणींची भरती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये केली जाणार आहे, त्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, विरोधकांना उकळ्या फुटून सोशल मीडियावर काहीपण बातम्या पसरवत आहेत, असेही अजित पवार म्हणाले.

गुरुवारी वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेत असताना अनेक ठिकाणी कर्मचारी कमी आहेत हे लक्षात आले. काही ठिकाणी तात्काळ कर्मचारी आवश्यक आहेत. विशेषतः शिक्षण विभागात आहे. नवीन शिक्षक भरती लगेच करता येत नाही म्हणून आम्ही निवृत्त झालेल्यांना तात्पुरते घेतले आहे. तशापध्दतीने इतर विभागात सहा महिने किंवा वर्ष लागत असते. लगेच भरती केली तर कोण कोर्टात जातात. अनुशेषाचा प्रश्न असतो, बिंदूनामावली सांभाळावी लागते. यामध्ये कुठल्याही घटकांच्या शंका-कुशंका राहता कामा नये. त्यामुळे काही बाबतीत तातडीने लोकं लागतात म्हणून ते घेण्याकरता त्या काळात निर्णय घेतला गेला तो निर्णय मागच्या सरकारच्या काळातील आहे. त्या निर्णयावर कुणाकुणाच्या सह्या आहेत हे मी दाखवायला तयार आहे.

आज ते सरकारमध्ये नाही मग लगेच आमच्या नावाने पावत्या फाडायचे काम सुरू झाले आहे. आम्हाला बदनाम करण्याचे काम सुरू झाले आहे. मी ३०-३२ वर्षे महाराष्ट्रात काम करतोय. तरुण-तरुणींचे काय प्रश्न आहेत. बेरोजगारीचे प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहेत. ते दूर करण्यासाठी दीड लाख तरुण तरुणींची भरती करतोय हेही अजित पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com