शिंदे-फडणवीसांच्या अर्थसंकल्पावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, चुनावी जुमला
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला आहे. यंदाचा अर्थसंकल्प पंचामृतांवर आधारलेला असल्याचे फडणवीसांनी सभागृहात सांगितले. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिलांसाठी मोठ्या घोषणा शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात आल्या. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. चुनावी जुमला अर्थसंकल्प असल्याची टीका त्यांनी केली.
अजित पवार म्हणाले की, शब्दाचे फुलोरे असलेला अर्थसंकल्प आहे. देहू येथे भरीव मदतीबाबत काहीच नाही. छत्रपती महाराज स्मारकाबाबतही काहीच घोषणा नाही. एक वर्षापूर्वी मी अर्थसंकल्प जाहीर केला. त्यात विकासाची पंचसूत्री मांडली होती. त्यांनी पंचांमृत आणला. कोणी अमृत पाहिले का? उद्योग थांबविण्यासाठी काही नियोजन नाही. बजेट खर्च 51 टक्के झालेला आहे. फक्त घोषणा करायचा अशी परिस्थिती आहे. जनतेला स्वप्नाच्या दुनियेत फिरवून आणण्याचे काम वित्तमंत्री यांनी केले, अशा शब्दात त्यांनी शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र डागले.
अर्थसंकल्पात किती निधी दिला स्पष्ट केले नाही. फक्त आम्ही हे करणार असेच म्हंटले. आमच्याच अर्थसंकल्पामधील गोष्टी रिपीट केल्या आहेत. शेतकरी वीज बिल माफीच्या घोषणेबाबत साधा उल्लेखही केला नाही. शेतकऱ्यांना तुटपूंजी मदतीपेक्षा त्यांच्या पिकांना चांगला दर द्या. भरीव तरतूद म्हणजे काय असते. ठोस असे अर्थमंत्री सांगण्यास तयार नाही. राज्याची कर्जबाजारीकडे वाटचाल सुरु आहे. आमचा भ्रमनिरास झाला आहे. निकाल विरोधी जाणार म्हणून जेवढ्या घोषणा करायचे तेवढ्या करून घ्या. पोटनिवडणुकीत झटका बसला. त्यामुळे जनता आपल्यासोबत नसल्याचे वाटतं असेल, असा टोलाही अजित पवारांनी फडणवीसांना लगावला आहे.