मुख्यमंत्र्यांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत दानवेंचा खोचक प्रश्न

मुख्यमंत्र्यांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत दानवेंचा खोचक प्रश्न

अंबादास दानवेंनी व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांना करुन दिली विधानांची आठवण

औरंगाबाद : वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्पावरून राज्यात सध्या राजकारण तापले आहे. सरकार व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पावसाळी अधिवेशनात सभागृहात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट केला करत त्यांच्या विधानांची आठवण करुन दिली आहे.

या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे राज्यात कसे मोठे उद्योग आणि गुंतवणूक येत आहे हे सांगत असतांना वेदांताचा उल्लेख करतांना दिसत आहे. वेदांतावाला आपल्याकडे ४ लाख कोटींची गुंतवणूक करत असल्याची माहितीही शिंदे या व्हिडिओमध्ये देताना दिसत आहे. यावरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला असून `सांगा आता हे कोण बोलले होते.. ते पण सभागृहात` अशी टीका केली आहे.

दरम्यान, वेदांताने प्रकल्प गुजरातला नेल्याचे जाहीर करताच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पावणे दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगार मिळवून देणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. परंतु राज्यातील सत्तांतरानंतर होताच वेदांता ग्रुपने गुजरातला पसंती दर्शवली. त्यापाठोपाठ आता बल्क ड्रग प्रकल्पही गुजरातला गेल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.

Lokshahi
www.lokshahi.com