अजितदादा तुम्ही योग्य जागी बसलात; अमित शहांचे विधान
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार विभागाच्या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी बोलताना अमित शहा यांनी ही जागा तुमच्यासाठी योग्य असल्याचे अजित पवारांना म्हंटले आहे. अजित पवार यांनी बंडखोरी करत आठ मंत्र्यांसह शिंदे-फडणवीस यांच्या युतीत सामील झाले. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.
मी पहिल्यांदाच अजित पवारांसोबत व्यासपीठावर बसलो आहे. अजित पवार आता योग्य ठिकाणी बसले आहेत. अजित पवार, तुम्हाला इथे यायला खूप वेळ लागला, असे अमित शहा यांनी म्हंटले आहे.
ते पुढे म्हणाले, आज मला हे जाहीर करायचे आहे की आतापासून सहकार क्षेत्र पूर्णपणे डिजिटल झाले आहे. ऑडिटचे काम असो, एचआरचे काम असो, देशात कुठेही सहकारी कार्यालय सुरू करणे असो, हे पोर्टल एकच थांबा आहे. यामुळे सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लागतील.
सहकार से समृद्धी' म्हणजे सर्वात लहान व्यक्तीला त्याचे जीवन सुधारण्याची संधी देणे आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी आणि सहकाराच्या माध्यमातून त्यांचे जीवन उन्नत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते, असेही अमित शहा यांनी म्हंटले आहे.