आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार; ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार; ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

जितेंद्र आव्हाड यांना केलेली अटक तसेच त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे आता राजकारण चांगलंच तापले आहे.

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांना केलेली अटक तसेच त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे आता राजकारण चांगलंच तापले आहे. आव्हाड यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेतल्यास आम्ही शिंदे गटात प्रवेश करू, अशा उपरोधिक आशयाचे पत्र नाशिकमधील ठाकरे गटाच्या नगरसेविका किरण गामणे-दराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. खोटे गुन्हे दाखल करून स्वतःची संघटना वाढवायची असेल तर आम्ही यायला तयार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काय आहे पत्रात?

मुख्यमंत्री महोदय गेल्या चार दिवसांत जितेंद्र आव्हाड यांच्यावर व्यक्तीगत दोष मनात धरुन दोन खोटे गुन्हे दाखल केले. तुरुंगात डांबले. त्यांचप्रमाणे खासदार संजय राऊत यांना बेकायदेशीर अटक केली. हे सर्व प्रकार निषेधार्ह आहे.

जितेंद्र आव्हाड आणि खासदार संजय राऊत यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास आपला सन्मान करत मी नगरसेविका किरण दराडे व माझ्या तीन सहकारी नगरसेविका आम्ही बिनशर्त शिंदे गटात तात्काळ धुमधाडाक्यात प्रवेश करु, असे किरण गामणे-दराडे यांनी पत्रात लिहिले आहे.

दरम्यान, विनयभंगाच्या गुन्हा नोंदणी झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट राजीनाम्याची घोषणा केली आहे. पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४, मी ह्या पोलिसी अत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com