दिघेसाहेब घात झाला...; राजन विचारेंचं भावनिक पत्र

दिघेसाहेब घात झाला...; राजन विचारेंचं भावनिक पत्र

Rajan Vichare यांचं आनंद दिघे यांना खुले पत्र लिहीत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) समर्थनार्थ अनेक नेत्यांनी शिवसेनेची (Shivsena) साथ सोडली. परंतु, आता शिवसेनेत इनकमिंग होण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी कार्यकर्त्यांची फौज शिवसेनेत आणली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. यानंतर राजन विचारे यांनी आनंद दिघे यांना खुले पत्र लिहीत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

दिघेसाहेब घात झाला...; राजन विचारेंचं भावनिक पत्र
Ravi Rana : राऊतांनंतर शिवसेनेचा 'हा' बडा नेता तुरुंगात जाणार

काय आहे राजन विचारे यांचे पत्र?

साहेब, आज तुम्हाला जाऊन 21 वर्षे उलटली. पण असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आली नाही. आज जरा जास्त आठवण येतेय. वयाच्या 16व्या वर्षापासून आम्ही तुमच्यासोबत काम करत आलो. लढलो, धडपडलो. या सगळय़ा प्रवासात तुम्ही माझ्यासोबत होतात. अजूनही अंधारात वाट दाखवत सोबतच आहात. अगदी धगधगत्या दिव्यासारखे.

फक्त शिवसैनिकच नव्हे, तर सर्वसामान्य मराठी माणूस सध्या अस्वस्थ झाला असून आज मीदेखील जितका अस्वस्थ आहे तितका पूर्वी कधीच नव्हतो. आता तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगू की घात झाला. दिघेसाहेब घात झाला आणि हो, तोदेखील आपल्याच लोकांकडून. म्हणूनच आज तुमची आठवण येतेय. या आधी जेव्हा असं झालं होतं तेव्हा गद्दारांना क्षमा नाही हे तुम्हीच बोलला होता ना साहेब? आज हे दुसऱ्यांदा झालंय. फक्त तुम्ही सोबत नाही. मग यांना माफ तरी कसं करायचं आम्ही? तेव्हा तुम्हाला झालेल्या वेदना आम्हालाही आता होत आहेत. पण रडायचं नाही, लढायचं हा विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना ही आपली संघटना आहे.

ठाण्यातील आनंदाश्रम आणि शिवसैनिक याचं नातं अगदी घट्ट आहे. त्याचा उल्लेख आनंद दिघे यांना लिहिलेल्या पत्रात करताना राजन विचारे म्हणतात, साहेब आज आनंदाश्रमाकडे पाहिलं आणि टचकन डोळय़ांत पाणी आलं. याच मंदिरात आम्हा सगळय़ांना तुम्ही शिवबंधन बांधलं होतं. आज काही जणांचं तेच बंधन माझ्या डोळय़ांसमोर तुटताना बघतोय म्हणून जरा गहिवरून येतंय साहेब.

कोणत्याही पदापेक्षा किंवा वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघटना, पक्ष महत्त्वाचा आहे. तुमची हीच शिकवण सोबत घेऊन आम्ही मानाने मिरवत पुढे जाऊ. साहेब काळजी नसावी. तुमचा राजन विचारे आणि सगळे सच्चे शिवसैनिक आपली संघटना पुन्हा नव्याने उभारण्यासाठी तयार आहोत. त्यासाठी आम्ही जिवाची बाजी लावू. पण ‘शिवसेनेचे ठाणे… ठाण्याची शिवसेना’ हे ब्रीदवाक्य कदापि पुसू देणार नाही. कितीही जण गेले तरी तुमचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आमच्यासोबत आहेत. त्यामुळेच पुन्हा एकदा शिवसैनिक या वादळात पहाडासारखा उभा राहील. फक्त तुमचा आशीर्वाद आणि सोबत असू द्या, असे राजन विचारे यांनी पत्रात म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com