आप-भाजप एकच आहेत, दोघेही फेक; काँग्रेसचा केजरीवालांवर हल्लाबोल
नवी दिल्ली : केंद्राच्या अध्यादेशाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहेत. या संदर्भात केजरीवाल यांनी नितीश कुमार, उध्दव ठाकरे, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. परंतु, काँग्रेसच्या बाबतीत मत विभागले गेले आहे.
दिल्ली कॉंग्रेसने ट्विटर अकाउंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केजरीवाल यांचा फोटो शेअर करत हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, आप आणि भाजप एकच आहेत. दोन्ही फेक आहेत. काँग्रेसने मोदी सरकारची ओळख जुमला आणि भ्रष्टाचार अशी सांगितली आहे. तर केजरीवाल सरकारची ओळख हवाला आणि घोटाळा सांगत टीकास्त्र सोडले आहे.
तर, अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधींची भेटीसाठी वेळ मागितली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना भाजप सरकारच्या अलोकतांत्रिक आणि असंवैधानिक अध्यादेश आणि फेडरल स्ट्रक्चर आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर झालेल्या हल्ल्याविरोधात संसदेत काँग्रेसचे समर्थन मिळावे, अशी विनंती केली आहे. त्यासाठी भेटीची वेळ मागितली आहे, असे केजरीवालांनी ट्विटरवर सांगितले आहे.
दरम्यान, दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्ती करण्याचा अधिकार केजरीवाल सरकारला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले होते. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने 19 मे रोजी अध्यादेश आणला. केजरीवाल यांनी हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल विरोधी पक्षांना भेटून या अध्यादेशाला संसदेत विरोध करण्याचे आवाहन करत आहे.