राणांच्या धमकीनंतर बच्चू कडू यांचे उत्तर; म्हणाले, या तारखेला मी घरी...
सूरज दाहाट।अमरावती: आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद मोठ्या गोंधळानंतर आता कुठे शांत झाल्याचे दिसून येत होते. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणला होता. त्यानंतर राणा यांनी माघार घेत, माझ्याकडून हा विषय संपला असल्याचं जाहीर केले होते. मात्र त्यानंतर बच्चू कडू यांनी मेळावा घेत अप्रत्यक्षपणे रवी राणा यांना माफ करत इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा बच्चू कडू यांनी रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे वाद पुन्हा उफाळला आहे. राणांनी दिलेल्या धमकीनंतर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत रवी राणा म्हणाले, “हा वाद आता मिटला आहे. पण कोणी मला दम देत असेल, तर ते योग्य नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम मोजला नाही. त्यामुळे बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे. बच्चू कडू जर दम देऊन बोलत असेल, तर त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे. त्यावरच प्रतिक्रिया देतांना बच्चू कडू म्हणाले की, कालच्या सभेत अमरावतीत मध्ये मी सार्वत्रिक बोललो कोणाचा कोथळा बाहेर काढू हे रवी राणा यांना मी बोललो नाही.
कार्यकर्त्यांनी शांत रहावे, मुद्दामून हा मोठा विषय करण्याचा प्रयत्न होत आहे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे, मला व्यक्तिगत रवि राणा बोलल्यामुळे कुणी यावर प्रतिक्रिया देऊ नये, मी आमदार होणार की नाही हे जनता ठरवणार आहे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. परंतु, मी 5,6,7 या तारखेला माझ्या गावी कुरळपुर्णाला आहे. रवी राणा यांनी तलवार घेऊन यावे मी हातात फुल घेऊन तयार आहे, माझ्या शरीराचे किती तुकडे करायचे आहे ते रवी राणा यांनी करावे, रवी राणा यांना जर मला मारायचे असेल त्यांनी यावे मी स्वतःच रक्त वाहून घेण्यास तयार आहे. परंतु, इतरही शेतकऱ्यांचे मुद्दे आहे त्यामुळे मी याकडे लक्ष देणार नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.