शरद पवारांनंतर अजित पवार गटाची बीडमध्ये सभा; सभा कशासाठी? मुंडेंनी सांगितलं कारण
साधारण एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. दरम्यान या सर्व राजकीय घडामोडी दरम्यान पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट झाली. या भेटीमुळे दोन्ही गटात प्रचंड संभ्रम निर्माण झाला मात्र, बीडमधल्या सभेत पवारांनी या संभ्रमाला पूर्णविराम दिला. 17 ऑगस्ट रोजी बीडमध्ये झालेल्या शरद पवारांच्या सभेनंतर आता 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. ही सभा शरद पवारांना उत्तर असेल अशा चर्चा सुरू आहे. दरम्यान आता यावरच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
27 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या सभेबाबत बोलताना मुंडे म्हणाले की, 17 तारखेला बीडमध्ये झालेली सभा कशासाठी होती हे मला अजून समजलंच नाही. परंतु, आपली 27 तारखेची (27 ऑगस्ट) सभा ही काही त्या सभेला उत्तर देण्यासाठी नाही. ही सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची आणि सन्मानाची असेल. असे त्यांनी स्पष्ट सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही तर चार वेळा अजित पवार यांच्यासहित सगळे मान्यवर नेते शरद पवारांचा आशीर्वाद घ्यायला गेले. त्यात काय चुकलं? आपल्या देवाचा आशीर्वाद घेतला त्यात आमचं काय चुकलं? आजही आम्ही तेच करतोय. म्हणून आपली सभा म्हणजे त्या सभेला उत्तर नाही. त्या सभेत कोण काय बोललं याला उत्तर नाही. त्यांना उत्तर द्यायचं आहे. त्यांना येणाऱ्या निवडणुकीत उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहोत. असे मुंडे यावेळी म्हणाले.