'मुख्यमंत्री असंच काम करत राहिले तर निवडणुकांमध्ये त्यांना जय महाराष्ट्र करावा लागेल'
मुंबई : शिशिर धारकर यांच्या प्रवेशावेळी उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले होते. यावरुन शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी उध्दव ठाकरेंवर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री जर असंच काम करत राहिले तर पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांना जय महाराष्ट्र करावा लागेल, हे त्यांना वाटत असावे, असा टोला गोगावलेंनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
भरत गोगावले म्हणाले की, आम्हाला वॉशिंग मशीनमध्ये धुण्याचा अर्थ काय मुंबईत तर आमचं घर नाही. आम्हाला वॉशिंग मशीनमध्ये टाका किंवा अन्य कुठे टाका आम्हाला त्याचा काय फरक पडणार नाही. रायगडमधील आमच्या शिवसेनेच्या तीन जागा भाजपच्या तीन जागा त्याचबरोबर लोकसभेच्या खासदारकीच्या दोन जागा आम्ही निवडून आणून दाखवू. पण त्याआधी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवा, असे आव्हानच त्यांनी उध्दव ठाकरेंना दिले आहे.
मूर्ख बनवण्याचा आम्ही काय काम केलंच. आज शिंदे हे सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी काम करतात. 24 तास जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री आपण यापूर्वी कधी पाहिला होता का? सगळ्या आव्हानांना शिंदे हे स्वतः सामोरे जात आहेत. जे अडचणीत येत आहेत त्यांना देखील स्वतः मदत करत आहेत. जर कुठली दुर्घटना जरी घडली तरी ते स्वतः जाऊन तिथे पाहणी करतात त्याचा आढावा घेत आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत हीच बाब त्यांना खूपते आहे का? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण आधीच्या मुख्यमंत्र्यांनी असं कधीही काम केलं नव्हतं हे आता त्यांना बहुदा जाणवत असावं. मुख्यमंत्री जर असंच काम करत राहिले तर पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांना जय महाराष्ट्र करावा लागेल, हे त्यांना वाटत असावे, असेही गोगावलेंनी म्हंटले आहे.
काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?
शिशिर धारकर यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले की, सगळ्याचं शिवसनेत स्वागत आहे, तुम्ही लढवयांच्या सेनेत प्रवेश केला आहात. काहीजण आव मोठा आणतात डोळे वटारले की पळून गेले, तुम्ही पळकुठे नाहीत याचा मला अभिमान आहे. तसं पाहायचं तर तुम्हाला सोपा मार्ग होता वाशिंग मशिनमध्ये जाऊ शकला असता. पण कर नाही त्याला डर कशाला. तुम्हाला मूर्ख बनवण्याचे उद्योग सुरु आहेत ते जास्त काळ चालणार नाही, अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली होती.