BS Yediyurappa
BS YediyurappaTeam Lokshahi

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा राजकारणातून निवृत्त; म्हणाले, शेवटच्या श्वासापर्यंत...

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनी विधानसभेत शेवटचे भाषण केले.

बंगळूरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) त्यांनी विधानसभेत शेवटचे भाषण केले. मी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे, पण भाजपला विजय मिळवून देण्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन. भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हे माझे एकमेव ध्येय आहे, असे येडियुरप्पा यांनी म्हंटले आहे. कर्नाटक विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता.

BS Yediyurappa
संजय राऊतांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल

येडियुरप्पा म्हणाले की, या निवडणुकीनंतर पाच वर्षांनी होणाऱ्या पुढील निवडणुकीतही जर देवाने मला ताकद दिली, तर मी भाजपला सत्तेत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. तुम्हाला आधीच माहिती आहे की, मी निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाने मला दिलेला आदर आणि मला दिलेले पद माझ्या हयातीत विसरता येणार नाही. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत भाजपची बांधणी आणि पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, यात शंका नसावी.

मला माझ्या (भाजप) सर्व आमदारांना सांगायचे आहे. आत्मविश्वासाने काम करा आणि अनेकांना (विरोधक) निवडणुकीच्या तयारीसाठी आमच्यासोबत येण्यास तयार आहेत, अशांना आम्ही सोबत घेऊन भाजपला स्पष्ट बहुमताने सत्तेत आणू शकतो.

शुक्रवारी अधिवेशन संपल्यानंतर ते शेवटच्या वेळी विधानसभेत बोलत होते. हा एक प्रकारे माझा निरोप आहे, कारण मी पुन्हा विधानसभेत येऊन बोलू शकत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यांन, दक्षिण भारतातील दिग्गज नेत्यांपैकी एक बीएस येडियुरप्पा (वय ७९ वर्ष) यांनी यापूर्वीच निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. येडियुरप्पा कर्नाटकचे चार वेळा मुख्यमंत्री राहीले आहेत. या वर्षी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सध्या भाजपचे सरकार सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजप पुन्हा एकदा कर्नाटकात सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेनंतर राज्यातील नेतेही उत्साहात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com