'उद्या शरद पवारही भाजपमध्ये आले...' सुधीर मुनगंटीवारांचे मोठे विधान
मागील काही दिवसांपासून राज्यात राजकारणात प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नाराज असल्यामुळे भाजपमध्ये जाणार अशा देखील चर्चा समोर आल्या. अशा विविध चर्चेने राजकीय वातावरण तापलेले आहे. याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केले आहे. उद्या शरद पवारही भाजपमध्ये आले, तर आम्ही त्यांचे स्वागतच करू असे ते म्हणाले आहे.
नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार?
अजित दादांशी त्यांच्या ज्येष्ट नेत्यांशी काय चर्चा झाली मला माहित नाही. ते अजित पवारच चांगलं सांगू शकतात. या देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी ज्या ज्या लोकांनी इच्छा व्यक्त केली, भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्या सगळ्यांना पक्षात सामावून घेतले जाते. भाजप हा काही एका कुटुंबापुरता मर्यादित असलेला पक्ष नाही. त्यामुळे अजित पवार आमच्यासोबत आले तर स्वागत करणार का हा प्रश्न असेल तर, मी सांगेन की, उद्या शरद पवारही भाजपमध्ये आले, ते येणार नाहीत, पण ते भाजपला पाठिंबा द्यायला तयार झाले किंवा उद्या जयंत पाटील भाजपमध्ये येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.