बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे, पडळकरांची पवार काका- पुतण्यावर विखारी टीका
राज्यात राजकीय गोंधळ सुरु असताना दुसरीकडे राजकीय मंडळींकडून जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच आता पवार कुटुंबावर नेहमी टीका करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे. दिवसा दरोडे टाकतात. अशा शब्दात त्यांनी काका पुतण्यांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले पडळकर?
बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे. दिवसा दरोडे टाकतात. शरद पवार यांनी ५० वर्षे राज्य केले पण कुठलाच विकास केला नाही. शरद पवार हे जाणता राजा नाही, तर नेमता राजा आहे. काका-पुतण्याची एकच टोळी राज्यात उपलब्ध आहे. दुसरी टोळीत उपलब्ध नाही. अशी बोचरी टीका पडळकर यांनी यावेळी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, ५० वर्षे तुम्ही राज्य केलात. कुणालाही चाळीस वर्ष दिलं तर तो जिल्ह्याचा विकास करेल. यांनी फक्त बारामतीचाच विकास केला. का त्यांना रस्ता करता आला नाही. आपलं सरकार आल्यानंतर रस्ता दिला. केंद्र आणि राज्य सरकार नव्हतं का. सगळं होतं पण, यांची नियत साफ नव्हती. यांच्याकडं दुरदृष्टी नव्हती. यांच्याकडं कल्पकता नव्हती. गाव, वाड्या यांचा विकास व्हावा, अशी दृष्टी नव्हती. यांना फक्त या महाराष्ट्रातल्या लोकांचं रक्त शोषायचं होतं, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली.