आव्हाडांचे समर्थन केले तर भाजपा रस्त्यावर उतरेल; बावनकुळेंचा इशारा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ठाणे कोर्टाने जितेंद्र आव्हाड यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर दिला आहे. तरी राज्यभरात राष्ट्रवादीने निषेध केला असून निदर्शने करत आहेत. अशातच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीला इशारा दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले आहेत. सोमवारी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको, रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर आज राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी अचानक मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी मोर्चा अडविल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादीला पत्रकार परिषदेतून थेट इशारा दिला आहे.
ते म्हणाले की, मी अमर आहे, अशी जितेंद्र आव्हाडांची वागणूक आहे. ते केवळ स्टंटबाजी करतात. नैतिकता असेल तर पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये. आता आव्हाड यांचे समर्थन केले तर भाजपा रस्त्यावर उतरेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
दरम्यान, शरद पवार आणि पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावे. सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करू नये, आम्ही अब्दुल सत्तारांचे कधी समर्थन केले नाही. आव्हाडांनी हिंमत असेल तर राजीनामा द्यावा, असेही आव्हान बावनकुळेंनी सोमवारी दिले होते.