'एकनाथ शिंदे 10-15 आमदारांना घेऊन कॉंग्रेस मध्ये जाणार होते'

'एकनाथ शिंदे 10-15 आमदारांना घेऊन कॉंग्रेस मध्ये जाणार होते'

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा गौप्यस्फोट

औरंगाबाद : कॉंग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या खुलाशानंतर आता राज्यात राजकारण रंगताना दिसत आहे. अशोक चव्हाणांच्या दाव्याला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दुजोरा दिला. तर, आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे 10-15 आमदारांना घेऊन कॉंग्रेस मध्ये जाणार होते, असा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दहा ते पंधरा आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. तेव्हा आमदार संजय शिरसाट यांनीच मला याबद्दल सांगितले होते, असाही दावा त्यांनी केला आहे. तसेच हे हिंदुत्ववादी विचाराचे नसून हे सत्तापीपासू विचारांचे आहेत. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत घेण्याचा त्यांना पटत नव्हतं तर त्यांनी अडीच वर्षे सत्ता का भोगली? असा सवालही चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, याआधी अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिस्त मंडळ 2014 मध्येच आमच्याकडे प्रस्ताव घेऊन आल्याचे सांगितले होते. तर, 2014 साली भाजपच्या अन्यायाविरुध्द एकनाथ शिंदे यांनीच पहिल्यांदा आवाज उठविला असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला होता. यावर आता शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com