सरसकट आरक्षण देण्यास आमचा विरोध; भुजबळांचे विधान
छत्रपती संभाजी नगर : मराठा आरक्षणाला मी किंवा माझ्या पक्षाने कधी विरोध केला नाही. मराठा समाजाला आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, आमची भूमिका ही सर्व पक्षांची आहे, असे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे. छगन भुजबळांनी आज बीडमधील जाळपोळीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
सुभाष राऊत यांचे सनराईज हॉटेल जाळले, सर्वात जास्त नुकसान झाले. प्रकाश सोळंके यांचे घर जळत असताना मी पोलिसांना सांगितले नंतर तीन तासाने हॉटेल जाळले. एक तास कार्यक्रम सुरू होता तेव्हा तेथील एक दोन पोलीस काही करू शकले नाही. हत्यार टाकून, कोयते, चोपर, पेट्रोल बॉम्बने प्रकाश सोळंके यांचे घर जाळण्यात आले. संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांचे घर जळण्यात आले. लहान मुलांना मुस्लिम समाजातील लोकांनी ओढून वाचवले. सांकेतिक नंबर देऊन सगळा प्लॅन रचला, असा आरोप त्यांनी केला आहे. मोठी मोठी हत्यारे घेऊन त्यांचे घर जाळले, पोलीस हतबल का झाले? पोलिसांना हे माहित नव्हतं का? पोलिसांनी प्रतिकार केला नाही, असे सवालही भुजबळांनी उपस्थित केले आहेत.
जरांगे जिथं उपोषणाला बसले तिथला लाठीचार्ज समोर आला. अंतरवली सराटी येथे 70 ते 80 पोलीस जखमी झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस मारतील असे महाराष्ट्र पोलीस निर्दयी नाहीत. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी व्हायला हवी. ज्यांनी दगड फेकले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जरांगे म्हणतात की आमचे माणसे जाळपोळ करत नाही असे असले तर मग गुन्हे मागे घ्यायला का लावतात? न्यायमूर्ती यांचे आयोग नेमतात आणि तेच सर सर करून हात जोडतात तर आम्हाला त्यांच्याकडून काय न्याय मिळणार, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
आरक्षण संपवण्याचे काम राज्यात सुरू आहे. तुम्ही सर्वांनाच कुणबी प्रमाणपत्र देत असेल तर समिती काय कामाची. मागच्या दरवाजाने प्रमाणपत्र देत आहेत. समाजाला वंशावळ असताना त्यांच्या इतर संबंधित लोकांना आरक्षण देणे हे कायद्याच्या विरोधात आहे. ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. काही दिवसात आरक्षण संपवण्याचा घाट घातला आहे. आज एवढी दहशत निर्माण झाली की लोक घाबरतात, तुम्ही आमदार आणि नेत्यांचे घर जळतात तर कोण बोलणार? 54 टक्क्यांपेक्षा जास्त समाजाची तुम्हाला मते नको का, असा थेट सवाल भुजबळांनी विचारला आहे. सगळ्या घटकाने आपला आक्रोश मांडला पाहिजे. आम्ही बोललो तर आमच्या जीवावर उठणाऱ्या शक्तीचा शोध घ्यायला हवा. ज्यांची घरे जाळली त्यांना सरकारने भरपाई करून देणे, अशी मागणी त्यांनी केली आहे