Chhagan Bhujbal on Sambhaji Bhide: देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली संभाजी भिडेंना अटक करा

सरकारने कठोर पावले उचलून भिडेंवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी आज मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे
Published by  :
Team Lokshahi

नाशिक: गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून नवा वाद रंगला आहे. संभाजी भिडे सातत्याने वादग्रस्त विधाने करत असल्याने राजकीय नेत्यांकडून अटकेची मागणी करण्यात येत आहे. उद्या मोदी महाराष्ट्रात येत असून त्यांच्या कानावर हा विषय घातला पाहिजे. सरकारने कठोर पावले उचलून भिडेंवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी आज मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविरुद्ध वक्तव्य केले होते. त्यानंतर महात्मा फुले यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केले. भिडे यांची बुद्धी भ्रष्ट झालीय की, त्याच्याकडून कोणी हे सर्व बोलून घेत आहे, हे तपासण्याची गरज आहे. मनोहर भिडे 15 ऑगस्टसुद्धा मानायला तयार नाहीत, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करायला पाहिजे. ते राज्यात, देशात वातावरण दूषित करण्याचं काम करत असून त्याविरोधात सर्वाना एकत्र आले पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे कमळाचा प्रचार करणार असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. यावर भुजबळ म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांविषयी कोणत्या आधारावर बोलत आहेत, मला माहिती नाही. बावनकुळे यांना सर्वच आधीच दिसतंय. बावनकुळे आता पंडित झाले आहेत का? अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते आहेत, ते राष्ट्रवादीचाच प्रचार करणार असे भुजबळ म्हणाले आहेत.

छगन भुजबळ खड्ड्यांच्या प्रश्नावर म्हणाले की, नाशिक-मुंबई मार्ग खड्डेमय झाला असून मुख्यमंत्री स्वतः पाहणी करत आहेत. नाशिक-मुंबई मार्गावर मास्टिकचा प्रयोग केला जात आहे. नाशिक शहरातही त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. शहरातील अनेक भागात खड्डे पडले आहेत, मात्र सद्यस्थितीत नवीन अधिकारी आले असल्याने त्यांना खड्डे बुजविण्याचं सूचना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com