किती लांडगे एकत्र आले तरी...; मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये बॅनरबाजी

किती लांडगे एकत्र आले तरी...; मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये बॅनरबाजी

ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी शिवसेनेनं आज त्याच ठिकाणी सभा आयोजित केली आहे.

लक्ष्मीकांत घोणसे-पाटील | रत्नागिरी : राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची खेड येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत ठाकरेंनी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार टीका केली. याच ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी शिवसेनेनं आज त्याच ठिकाणी सभा आयोजित केली आहे.

खेडमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोळीबार मैदानावर उत्तर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. सभेसाठी दोन दिवसांपासून गोळीबार मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. वेगवेगळ्या राजकीय बॅनरमुळे खेडमध्ये वातावरण तापले आहे. ढाण्या वाघ आणि करारा जवाब मिलेगा अशा आशयाचे बॅनर गोळीबार मैदानाच्या गेटवर लावण्यात आला आहे. तर भरणे नाक्यात 'असे किती लांडगे एकत्र आले तरी वाघाची शिकार करू शकत नाही. वाघ हा सगळ्या पुरून उरतो' अशा आशयाच्या बॅनरने सर्वाचे लक्ष वेधले आहे.

सध्या कोकणात राजकीय शिमग्याचे ढोल जोरात वाजत आहेत त्यातच कदम आणि जाधव यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे आजच्या सभेत माजी मंत्री रामदास कदम नेमके काय बोलणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मात्र सूत्राच्या माहितीनुसार, आज रामदास कदम मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com