'दादांना, सहशिवसेनाप्रमुख करा' मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप- प्रत्यारोप करत करताना दिसत आहे. याच अधिवेशनात शिवसेनेच्या बंडखोरांवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला होता. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
अजित पवारांच्या टीकेला उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अजितदादा, तर आता शिवसेनेचे जोरदार प्रवक्ते झाले आहेत. त्यांना आता पदच देण्याचे तेवढे बाकी आहे. तेवढ्यात शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दादांना, सहशिवसेनाप्रमुख करा,’ असे सुचविले. तेवढ्यातच त्यांना निवडणूक आयोगाचा निर्णय आठवला आणि म्हणाले ‘ते आता सहशिवसेनाप्रमुखही होऊ शकत नाहीत. कारण, शिवसेना आपल्याकडे आहे. अजितदादा, तीपण संधी गेली. असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी लगावला.
पुढे ते म्हणाले की, ते मला एकदा बोलत होते. एकनाथराव, तुम्ही आमूक आमूक माणसाला भेटलात का. बघा असं आहे की, काही लोकांनी जो अगोदर निर्णय घेतला आहे. राणे, वगैरे. त्यांना पुढच्या निवडणुकीत प्रॉब्लेम झाला. शिवसैनिक एकदम तीव्र असतात. मी म्हणालो, मी असं कोणाला भेटलोच नाही. मी त्यांना बोलणार होतो की, शिवसैनिक तीव्र असतात. शिवसेना लढाऊ आहे. शिवसेनाच मी आहे. तोच मी आहे. मी तुम्हाला हे पहिले बोललो नाही. कारण, मी पहिले बोललो असतो तर तुम्ही जाऊन गडबड केली असती, ना, असे शिंदे यावेळी म्हणाले.
भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे बॅनर लागत आहेत. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, एकदा ते ठरवा, कोण होईल नेमकं. गेल्या सहा महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर चहापान्याचा खर्च २ कोटींच्या घरात झाला. यावरून अजित पवार यांनी आरोप केले. यावरून एकनाथ शिंदे यांनी प्रतिसवाल केला. पण कोरोना काळात वर्षा बंगल्यावर माणसं नसताना, फेसबुक लाइव्ह असताना किती खर्च आला, हे तुम्ही पाहिलं नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.