महाराष्ट्र द्रोह मोठा की देशद्रोह मोठा? अजित पवारांच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचा सवाल
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच या गदारोळादरम्यान उद्यापासून राज्याचे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र, त्याआधी आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. याबाबत राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली होती. त्यावेळी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली होती. त्यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
बरं झाले अजित पवारांसोबत चहा पिण्याची आमची वेळ टळली
उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेतून त्यांची मानसिकता दिसून आली. आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता. मला त्यांना सांगायचा आहे की, दाऊदची बहिण हसिना पारकरला ज्यांनी चेक दिला. त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजनीमा घेतला नाही. बरं झाले अजित पवारांसोबत चहा पिण्याची आमची वेळ टळली. कारण महाराष्ट्र द्रोह मोठा की देशद्रोह मोठा? सत्तेच्या बाहेर पडल्यामुळे अजित पवार वैफल्यग्रस्त झाले आहेत.आम्ही समजू शकतो. मासा पाण्याविना तडफडतो, तशी सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर विरोधकांची अवस्था झाली आहे, असे जोरदार प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी पवारांना दिले आहे.
सेनेतून बाहेर पडलेल्यांचे काय होणार बघा?
पुढे ते म्हणाले की, माझ्यावर निष्ठा बदलल्याचा आरोप केला जातो. परंतु, मी अजित पवारांसारखे नाही केले. एकदा देवेंद्र फडवणवीसांसोबत शपथ घेतली नंतर दुसऱ्यांदा मविआकडून शपथ घेतली. मी बाळासाहेबांची भूमिका घेऊनच पुढे चाललो आहे. त्यांनी आरोप करताना थोडे तारतम्य बाळगले पाहीजे. अनेक महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलेल आहे. अनेकवेळेला ते म्हणतात की, सेनेतून बाहेर पडलेल्यांचे काय होणार बघा? काहीही होणार नाही. आम्ही शिवसेनाच आहोत. आता जाऊद्या उद्या त्यांना सभागृहात उत्तर देऊ. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.