सत्यजीत तांबेंच्या आरोपांवर नाना पटोलेंचे उत्तर; म्हणाले, कुणाबद्दल काय...
राज्यात नुकताच शिक्षक आणि पदवीधर निवडणुक पार पडली. पाच जागांसाठी ह्या निवडणुका झाल्या. परंतु, सर्वात जास्त चर्चेत आला. तो म्हणजे नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ या जागेमुळे मोठा पेच निर्माण झाला होता. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. प्रचंड गोंधळ झाल्यानंतर आता सत्यजीत तांबे हे निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. मात्र, आज पत्रकार परिषद घेऊन सत्यजीत तांबेंना महाराष्ट्र काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावरच आता नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे.
आरोपांवर काय म्हणाले नाना पटोले?
सत्यजीत तांबेंनी केलेल्या आरोपांवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, सत्यजीत तांबे यांच्या विषयावर मी काही बोलणार नाही, ते काम पक्षाचे प्रवक्ते करतील. तेच त्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देणार आहेत. कुणाबद्दल काय बोलावे, याचे नियम असतात ना? मी सगळंच, सगळ्यांचे ऐकतोय. मी काँग्रेसचा राज्यात प्रमुख आहे. विरोधकांचे ऐकावे लागते, आपल्या लोकांचे पण ऐकावे लागते. त्यामुळे आम्ही सर्वांचं ऐकतो. असेही ते यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, मी विखेंच्या बद्दल काही दिवसांनी बोलणार आहे. मी एकदम पद्धतशीर बोलणार आहे. आता आमच्या मित्राच्या मागे लागले आहेत. माझे मित्र कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आहेत. आता त्यांची जागा हे घ्यायला पाहत आहेत. ज्या लेव्हलवर आम्हाला बोलायचं आहे त्या लेव्हलवर आम्ही बोलू. नाशिकमध्ये जो काही सर्वपक्षीय हाय व्होल्टेज झालाय ते सगळ्यांना माहिती आहे. आमचे प्रवक्ते सर्व पुरव्यांनिशी माहिती देतील. त्यावर त्यांनी बोलावं. असे देखील पटोलेंनी सांगितले.
अजित पवारांवर गंभीर आरोप?
मला तर वाटतं, अजित पवार म्हणत आहेत की आम्ही मतं मारली. विखे म्हणतात आम्ही मते मारली. मी तुम्हाला सांगितले ना, हा सर्व हाय व्होल्टेज ड्रामा होता. तो आता समोर येतो. आम्हाला जनतेच्या दु:खाचं निराकरण करायचं आहे. आमच्यासमोर खूप कामं आहेत. आम्हाला हाय व्होल्टेज ड्रामामध्ये फसायचं नाही. आमचे घरातले भांडण होते. या घरातल्या भांडणाला चव्हाट्यावर आणण्याचे काम अजित पवारच करत आहेत. असा आरोप त्यांनी अजित पवार यांच्यावर केला.