कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच; आशिष देशमुखांचे मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच; आशिष देशमुखांचे मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र

कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आशिष देशमुखांनी पत्र लिहून मागणी केली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदला, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मागणी केली आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे देशमुखांनी पत्र लिहून मागणी केली आहे. महाराष्ट्रातील कॉंग्रेसची परिस्थिती चिंताजनक आहे. सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने कॉंग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे, असा आरोपही आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंवर केला आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच; आशिष देशमुखांचे मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र
संजय राऊतांचे 'ते' विधान, डॉक्टरांची नाराजी... अन् थेट उद्धव ठाकरेंनी काढली समजूत

काय आहे पत्रात?

फेब्रुवारी २०२१ मध्ये नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने कॉंग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. पण तो विश्वास त्यांनी सपशेल फोल ठरवला. विदर्भ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशैलीमुळे हा बालेकिल्ला आता कॉंग्रेसच्या हातातून निसटला आहे, हे सर्वश्रुत आहे. सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने कॉंग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची दाणादाण उडत आहे.

ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची वाताहत सुरु झाली आहे. जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणूकीत चंद्रकांत हांडोरे हे नंबर एकचे उमेदवार होते. पण भाई जगताप यांना जास्त मते मिळाली, त्यामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. हांडोरे यांना निवडून आणण्याचे हायकमांडचे आदेश होते. तरीही या आदेशाच्या विरोधात निकाल लागला. ४ जुलै २०२२ ला शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी परीक्षा होती. यावेळी विरोधकांची एकजूट महत्वाची होती. पण कॉंग्रेसचे तब्बल १० आमदार या बहुमत चाचणीत गैरहजर राहिले. यामुळे सरकारचे बहुमत मोठ्या प्रमाणात वाढले. पक्षादेश असतांनासुद्धा अनेकांनी पक्ष विरोधी काम केलं. या तीनही प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते, त्यासाठी हायकमांडकडे अहवाल पाठवणार असल्याचे दावे त्यांनी केले. पण आजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही किंवा कोणालाही जबाबदार ठरविण्यात आले नाही.

सर्व बाजूंनी कॉंग्रेस सपशेल तोंडघाशी पडली आहे. सत्ता गेल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी एकसंघ आहे, हे चित्र खोटे ठरले आहे. जर भाजपने पाठींबा दिलेले सत्यजित तांबेसारखे अपक्ष उमेदवार पाचही जागेवर निवडून आले तर विधान परिषदेच्या सभापती पदाचा तिढा तयार होईल. महाराष्ट्रात बेबंदशाही आहे, असे म्हणायलाही आता काही अर्थ उरलेला नाही. राज्यात पक्ष पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. शिंदे गटामुळे पक्ष पाचव्या क्रमांकावरही जाईल. पक्षात शिस्त नाही. मुळात पक्षाच्या विचारधारेवरही नेत्यांच्या मनात आदर नाही. एकीकडे राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत, पण स्थानिक कॉंग्रेस नेत्यांना मात्र पक्षापेक्षा स्वत:च्या सत्तेची पडलेली आहे. अशा कॉंग्रेस विरोधी घटना घडत असतांना प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांमध्ये कारवाई करण्याची धमक उरलेली नाही. तसे केल्यास पक्षात कोण उरेल, अशी भीती त्यांच्या मनात आहे.

महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे भविष्य हे महाराष्ट्रातील लोकांच्या हातात आहे. कॉंग्रेसला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मजबूत नेते आणि कार्यकर्त्यांचं नेटवर्क तयार करावे लागणार आहे. नेते व कार्यकर्ते पुन्हा नक्कीच जुळतील पण त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील शिर्षत्व नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणजेच महाराष्ट्र प्रदेशातील नेतृत्व हे सक्षम असणे गरजेचे आहे. म्हणूनच, महाराष्ट्रात कॉंग्रेसची स्थिति सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष तात्काल बदलण्याची नितांत गरज आहे, असे आशिष देशमुख यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com