कांदा परवडत नसेल तर खाऊ नका; दादा भुसेंचा अजब सल्ला
नाशिक : केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळं कांदा निर्यात शुल्क वाढीविरोधात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले. अशातच, दादा भुसे यांनी नागरिकांना अजब सल्ला दिला आहे. कांद्याचे भाव वाढले आहे तर चार महिने कांदे खाऊ नका, असा सल्ला दादा भुसे यांनी नागरिकांना दिला आहे. या विधानावरुन आता दादा भुसेंवर टीका करण्यात येत आहे.
दादा भुसे म्हणाले की, कांद्याचे दर कोसळतील, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. ज्यांनी कांदा खरेदी केला आणि निर्यात करणार यावर देखील व्यापाऱ्यांमध्ये देखील थोडी भीती आहे. या भावना केंद्र सरकारच्या कानावर घातल्या जातील. निश्चितच सकारात्मक मार्ग निघेल. हा सत्ताधारी, विरोधक विषय नाही. काही वेळा कांद्याला २०० ते ३०० भाव मिळतात, काही वेळा २ हजारपर्यंत भाव जातात. यामुळे उत्पादन आणि पुरवठा यावर नियोजन करावं लागतं. हा नाशिक जिल्ह्यात संवेदनशील विषय आहे. चर्चा करून मार्ग काढला जाईल. सर्व व्यवहार सुरळीत होतील, असं नियोजन केलं जाईल.
कांदा दर पडणार नाही, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल. चांगल्या गोष्टीसाठी पवार साहेबच काय, कुणी पण असेल, चांगलं मार्गदर्शन असेल, तर स्वागतच असेल. कांद्याच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे. नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा विचार करता, विचार विनिमय करून हा निर्णय व्हायला हवा होता, ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला, तर काही अडचण नाही. ज्यावेळी आपण १ लाखांची गाडी वापरतो, त्यावेळी १० रुपये जास्त देऊन २० रुपये देऊन माल खरेदी करावा. ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते, असा सवालही दादा भुसेंनी केला आहे.