सत्यजीत तांबे यांच्याबद्दल फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, त्या कार्यक्रमाला काँग्रेस नेते...
काल नाशिक पदवीधर उमेदवारीवरून प्रचंड गोंधळ निर्माण झाला. डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. दुसरीकडे भाजपने त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. भाजप तांबे यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा देखील होत्या. त्यातच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सत्यजित तांबे यांचे कौतूक केले होते. त्यावरच आता त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया दिली. असं कुठलंही गणित आम्ही घडवलेलं नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला जरुर गेलो होतो. पण त्या कार्यक्रमाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही होते आणि इतर विविध पक्षांचेदेखील नेते होते. याशिवाय आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातच असतो ना? राजकारणात एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणं हे काही नवीन नाही.
पुढे ते म्हणाले की, आता जो काही घटनाक्रम झाला तो वाटतो तसा नाही. योग्यवेळी सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील. त्याची वाट बघा. आम्ही नाशिकमध्ये उमेदवार देणं टाळलेलं नाही. शेवटी आम्हीदेखील त्या ठिकाणी उमेदवार देण्याच्या प्रयत्नात होतो. आमची मनापासून इच्छा होती की राजेंद्र विखे यांनी त्याठिकाणी अर्ज दाखल करावा. आमचे त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरु होते. पण काही कारणास्तव त्यांनी असमर्थता दाखवली. अन्यथा आम्ही त्यांना उमेदवारी देणार होतो , असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.