‘करेक्ट कार्यक्रम’ म्हणणाऱ्या अजित पवारांना फडणवीसांचा सल्ला; म्हणाले, फार राग...
राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून भाजपने मिशन लोकसभा अंतर्गत बारामतीवर लक्ष केंद्रित केले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीचा दौरा केला होता. त्यावेळी ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचं आव्हान राष्ट्रवादीला दिलं होतं. मात्र, या विधानाचे पडसाद नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात दिसून आले. अधिवेशनात या विधानाचा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले फडणवीस?
बारामतीत येऊन कोणी आव्हान देणं अजित पवारांना आवडत नाही. राजकारणात कोणी आढळपद घेऊन आलं नाही. इंदिरा गांधी यांच्यासारख्या अतिशय शक्तीशाली नेत्याला देखील निवडणुकीत पराभवाला सामोर जावं लागलं होतं.
२०१४ साली सुप्रिया सुळे थोड्या मतांनी निवडून आल्या आहेत. बारामती मतदारसंघावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं लक्ष आहे. ‘मिशन बारामती’ प्रमाणे ‘मिशन महाराष्ट्र’ आहे. ‘मिशन महाराष्ट्र’ अंतर्गत बानवकुळे बारामतीत गेल्याने बावनकुळेंना अजित पवारांना फार राग आलेला दिसत आहे. अजित पवारांना समजून सांगू, की महाराष्ट्रात सगळीकडे आम्ही जात आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले होते अजित पवार?
राज्यात शिंदे-भाजपा सरकार स्थापन झाल्यावर एक नेते बारामतीत आले. तसेच, बारामतीत घड्याळ बंद करत ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार असल्याच्या वल्गना करु लागले. आता आमचं तिथे काम आहे, खरचं ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार आहे का? जर मनात घेतलं तर, त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करेन. महाराष्ट्राला माहिती मी आव्हान दिलं तर कोणाचंही ऐकत नाही. असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.