याची गॅरंटी मी माझ्याही घरी घेऊ शकत नाही...,कौटुंबिक न्यायालयासंदर्भातील प्रश्नावर फडणवीसांचे उत्तर
राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. नेहमीप्रमाणे या अधिवेशनात देखील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक वाद होताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपाचे सुरू असताना आज या अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी एक भन्नाट किस्सा घडला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनोदी शैलीत उत्तर दिले आहे. मात्र, त्यांच्या या उत्तरामुळे सभागृहात एकच हशा पिकला.
नेमकं काय घडलं?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज पाचवा दिवस होता. यावेळी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारला. ते म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री आताच म्हणाले की प्रत्येक जिल्ह्यात आता कौटुंबिक न्यायालयाच्या केसेस वाढत आहेत. आता गृहमंत्रीही तेच आहेत. त्यामुळे त्यांच्या कल्पकतेने ते असं काही धोरण आणणार का की, कौटुंबिक वाद न्यायालयापर्यंत पोहचणारच नाही?' असा प्रश्न शिंदे यांनी फडणवीसांना विचारला.
त्यानंतर शिंदेंच्या या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी हसत हसत उत्तर दिले. ते म्हणाले की, कसंय. याची गॅरंटी तुम्ही तुमच्या घरी घेऊ शकत नाही आणि मी माझ्याही घरी घेऊ शकत नाही. फक्त न्यायालयात पोहचण्यालायक होणार नाही याचा प्रयत्न करू शकतो. असे उत्तर देताच सभागृहात एकच हशा पिकाला आणि सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या गंभीर चर्चेचं वातावरण अवघ्या काही सेकंदात बदललं.