एक दिवसांचं मुख्यमंत्रीपद मिळालं तर काय कराल? अमृता फडणवीसांचा राज ठाकरेंना सवाल
‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत पार पडली. विशेष म्हणजे ही मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना एक दिवसांचं मुख्यमंत्रीपद मिळालं तर काय कराल?, असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
नेमका काय विचारला अमृता फडणवीस यांनी प्रश्न?
अमृता फडणवीस : राज तुमच्या जीवनात राजकीय आशांपेक्षा सामाजिक आशय दिसून येतो. तुमच्या भाषण, वेगवेगळे आंदोलनात ते दिसून येतं. तुमची आंदोलनं यशस्वी झाली. आमच्या शुभेच्छा आहेत की आपण नक्की मुख्यमंत्री बनावेत आणि पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा. पण परिस्थिती अशी आली की तुम्हाला मुख्यमंत्री बनावं लागलं पण ते फक्त एक दिवसाचं, त्या एक दिवसात तुम्ही काय कराल?
राज ठाकरे : एका दिवसात काय होतं? तुम्ही पाच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देत होता, आता एका दिवसावर कुठे आलात?
अमृता फडणवीस : नाही तुम्हाला सहा महिने दिले तर तुम्ही लगेच काय बदलाव आणाल?
राज ठाकरे : असं आता मला सहा महिने, एक दिवस, पाच दिवस असं सांगता येणार नाही. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत त्या सहज बदलू शकतो. कायदे आहेत. कायदा आहे पण ऑर्डर नाही. मला वाटतं कायदे आहेत. पण त्याची अंमलबजावणी होत नाही. मला असं वाटतं ऑर्डरची गरज आहे. त्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. तुम्ही त्यांच्या हातामध्ये 48 तास द्या. त्यांना सांगा, मला महाराष्ट्र साफ करुन द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. पण त्यांना ऑर्डर नसतं. रिस्क कोण घेईल? पोलिसांनी एखादी भूमिका घेतल्यावर जेलमध्ये जावं लागत असेल तर ते जेलमध्ये का जातील आणि कुणासाठी जातील? बसलेलाच माणूस टेम्पररी आहे. त्यासाठी ते जेलमध्ये जातील.
अमृता फडणवीस : मला वाटतं पोलीस ऑफिसरलाच एक दिवसाचा मुख्यमंत्री बनवला पाहिजे?
राज ठाकरे : आपल्याकडे उत्तम पोलीस अधिकारी आहेत. महाराष्ट्र त्याबाबतीत भाग्यवान आहे. फक्त त्या लोकांना 48 तासांसाठी मोकळा हात द्या.