दिल्ली महापालिकेमध्येही 'झाडू'; भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवून 'आप'चा झेंडा

दिल्ली महापालिकेमध्येही 'झाडू'; भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवून 'आप'चा झेंडा

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत (एमसीडी निवडणूक) आम आदमी पक्षाला (आप) बहुमत मिळाले आहे.

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत (एमसीडी निवडणूक) आम आदमी पक्षाला (आप) बहुमत मिळाले आहे. मागील 15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेवरील भाजपची सत्ता मोडीत काढत आम आदमी पक्षाने झेंडा रोवला आहे. आपने (आप) 134 जागा जिंकल्या आहेत. तर, भाजप दुसऱ्या क्रमांकावर असून 104 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसला केवळ 9 जागा जिंकता आल्या आहेत. तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

गुजरातमध्ये आपचा जोरदार प्रचार सुरू असताना दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आपची ताकद दोन्ही राज्यात विभागली गेली. सलग चौथ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्री, भाजपचे सहा मुख्यमंत्री व शंभराहून अधिक पदाधिकारी असा फौजफाटा प्रचारात उतरवला होता. तरीही, भाजपला निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. व दिल्ली महापालिकेत आपने बहुमताचा आकडा पार केला आहे.

कडेकोट बंदोबस्तात बुधवारी सकाळी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. एमसीडीच्या 250 प्रभागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झाले. यामध्ये 1,349 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. यावेळी निवडणुकीत 50.48 टक्के मतदान झाले. यापूर्वी 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने 270 पैकी 181 प्रभाग जिंकले होते. उमेदवारांच्या मृत्यूमुळे दोन जागांवर मतदान होऊ शकले नाही. आपने 48 तर काँग्रेसने 27 वॉर्ड जिंकले होते. त्या वर्षी सुमारे 53 टक्के मतदान झाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com