धनंजय मुंडे की पंकजा मुंडे, आता 2024 मध्ये कोणाला मिळणार उमेदवारी?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता चर्चा रंगली आहे ती धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची. बीड आणि परळीच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये सतत डावलण्यात येत असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंडे बहीण-भावाने एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरत निवडणूक लढवली.
आता अजित पवारांच्या भूमिकेनंतर परळीच्या राजकारणात नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले असून, त्यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या गटाने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यापैकी 2024 मध्ये कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. यावरुन आता जोरदार चर्चा रंगली आहे.