शिंदे गटात प्रवेश करताच खासदार किर्तीकर यांची ठाकरे गटाच्या नेते पदावरून हक्कालपट्टी
राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु असताना, दुसरीकडे मात्र, शिवसेनेतील गळती काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना(ठाकरे गटाला) मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर लगेचच हा प्रवेश झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने किर्तीकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते पदावरून हक्कालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेत शिवसेनेतून बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. पण निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यानंतर आता गजानन किर्तीकर यांनीही शिंदेंना पाठिंबा दिला आहे. गजानन किर्तीकर यांच्या या पक्ष प्रवेशांने शिंदे गटाच्या खासदारांची संख्या वाढली. या प्रवेशामुळे शिंदे गटाला आगामी मुंबई पालिका निवडणुकीत मदत होणार आहे.