पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर, भाजप सोडणार? एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितले
मंगेश जोशी | जळगाव : पंकजा मुंडे भाजपवर अनेक दिवसांपासून नाराज असून अनेकदा उघडपणे बोलूनही दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे भाजपची साथ सोडणार असल्याच्या चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशातच, पंकजा मुंडे यांना बीआरएसकडून थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाली आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केसीआर यांच्या बीआरएस पक्षाने पंकजा मुंडे यांना आपल्या पक्षात मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असली तरी पंकजा मुंडे या बीआरएस पक्षात जाणार नसल्याचे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. पंकजा मुंडे ह्या लोकप्रिय नेत्या असून त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहेत. आपल्या पक्षाला बळ मिळवण्यासाठी त्यामुळे प्रत्येक पक्षाला असं वाटतं की पंकजा मुंडे या आपल्या पक्षात असाव्यात. मात्र, पंकजा मुंडे या आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित असून दुसरा पक्षात जाण्याचा पंकजा मुंडे विचार करणार नसल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितले आहेत.