चंद्रकांत पाटील अभी तो बच्चा है! एकनाथ खडसेंचा पलटवार
मंगेश जोशी | जळगाव : मुक्ताईनगर साखर कारखान्यासाठी घेतलेले 32 कोटींचे कर्ज होते खोके नव्हते असे म्हणत चंद्रकांत पाटील अभी तो बच्चा है, असा जोरदार पलटवार आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांवर केला आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर हे चांगले तापले असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केल्यानंतर खडसेंनी देखील चंद्रकांत पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे.
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाऊन आमदार झाले आणि आता 50 खोके सबकुछ ओके असे म्हणत आहेत. मात्र, ज्या जिल्हा बँकेत शेतकऱ्यांना एकरी चाळीस हजार कर्ज मिळते व त्यासाठी दीड लाखाची जमीन गहाण ठेवावी लागते. त्याच जिल्हा बँकेत चेअरमन असताना एकनाथ खडसे यांनी आपल्या मुक्ताईनगर साखर कारखान्यावर 81 कोटींचे कर्ज मंजूर करून घेतल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. व त्यावरून 81 कोटी सबकुछ ओके नाही का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.
यावर एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. मुक्ताई साखर कारखाना हा माझा नसून कारखान्याला दिलेले कर्ज कारखान्याने व्याजासह फेडून ओके केले आहे. आणि कारखान्यासाठी दिलेले 32 कोटी हे कर्ज होते खोके नव्हते. ते वैयक्तिक लाभासाठी मिळालेले नसल्याचे म्हणत आमदार चंद्रकांत पाटील यांना प्रशिक्षण देण्याची गरज असून अभी तो बच्चा है, अशी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटलांवर खडसेंनी जोरदार पलटवार केला आहे.
'ओक्के कोणाचे खोके कोणाचे हे जनतेला माहिती'
भाजप-शिवसेनेची युती तुटेल असा कोणताही भविष्यकार सांगू शकत नव्हता. मात्र, 2014 मध्ये हे काम एकनाथ खडसे या माणसाने केला असल्याचा हल्लाबोल करत आमदारच व्हायचं होतं तर मग युती का तोडली? असा थेट सवाल आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात उपस्थित केला होता.
चंद्रकांत पाटलांच्या या आरोपाला देखील एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर देत युती तोडण्याचा अधिकार असता तर मीच मुख्यमंत्री झालो असतो, असे म्हणत युती तोडण्याचा निर्णय हा भाजपने सामूहिकरित्या घेतला होता. व त्यावेळी भाजपचा जबाबदार नेता म्हणून त्या निर्णयाची घोषणा केली असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. तर खडसेंनी युती तोडल्यामुळे मी आमदार झाल्याचे म्हणणारे चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना भाजपची युती असताना युतीविरोधात अपक्ष निवडणूक लढवत विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतली व अपक्ष म्हणून शिवसेना मदत केली.
मी गेले 40 वर्ष आमदार आहे तर चंद्रकांत पाटील यांच्या आमदारकीला केवळ तीन वर्षे झाले आहेत आणि आता अचानक करोडो रुपयांच्या गाड्या घोड्या कशा येतात, असा सवाल उपस्थित करत ओके कोणाचे आणि खोके कोणाचे हे जनतेला माहिती असल्याचे म्हणत खडसेंनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे.