...त्यापेक्षा मोदी-शहांचे हस्तक होणे चांगले; शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

...त्यापेक्षा मोदी-शहांचे हस्तक होणे चांगले; शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

औरंगाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

औरंगाबाद : दाऊद आणि याकूब मेमनच्या कबरीला परवानगी देऊन देशद्रोह्यांचे हस्तक होण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यासोबत हस्तक होणे चांगले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर केली आहे. शिवसेनेच्या मुखपत्र सामनामधील रोखठोक सदरातील टीकेला आज शिंदेंनी प्रत्युत्तर दिले.

बाळासाहेबांचा विचार बुडवले, सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात. ही विचारांची सुंथा कुणी केली. बाळासाहेबांना धोका कुणी दिला, त्यांचे विचार पायदळी कुणी तुडवले, हे तुम्ही महाराष्ट्राला सांगा, असे थेट आव्हानच शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.

एकनाथ शिंदे गट लाचार असा उल्लेख करण्यात आला. मोदी आणि शाहांचे हस्तक म्हणून काम करीत आहेत, अशी टीका करण्यात आली. परंतु, दाऊद आणि याकूब मेमनच्या कबरीला परवानगी देऊन देशद्रोह्यांचे हस्तक होण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यासोबत हस्तक म्हणून राहायला काय वाईट आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.विरोधकांच्या शब्दकोषात केवळे खोके आणि गद्दारी हे दोनच शब्द उरले आहेत. तुमच्या खोक्यांचा हिशोब आत्ता काढत नाही, असेही शिंदे यांनी म्हंटले आहे.

शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री का होऊ शकत नाही, सोन्याचा चमचा घेतलेलाच नेहमी का मुख्यमंत्री होतो. हे काय अ‍ॅग्रीमेंट केले आहे का, तुमचा पोटशूळ का उठतो. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

मुंबईत मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी जाहीर करावी. मुंबईतील मराठी माणूस विरार, बदलापूरपर्यंत का गेला, याचा विचार करायला हवा, रोखठोकमध्ये याचं विश्लेषण करायला हवं. निवडणुकीसाठी केवळ मराठीचा मुद्दा पुढे करायचा, निवडणुकीनंतर मात्र मराठी माणूस देशोधडीला का लागलाय, याचा विचार करायला हवा, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले आहे.

एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे, तर याच साबणाने तुमची चांगली धुलाई केली हे विसरु नका. शिवसेनेच्या सभेला, रोड शोला राष्ट्रवादीची माणसे पाठवली जातात, त्यामुळे अशा गर्दीची सवय शिवसेनेला नाही. खरी शिवसेना कोणती याचं उत्तर मिळालेलं आहे. ही गर्दी पैसे देऊन आणलेली गर्दी नाही. ही सच्च्या शिवसैनिकांची गर्दी आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपाची 200 आमदार आलेशिवाय नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com