स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री इर्शाळवाडीत; म्हणाले, मी चिखल तुडवत...
रायगड : इर्शाळवाडीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले होते. या घटनेने इर्शाळवाडीवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. अशा वेळी सरकारने मदतीचा हात पुढे करत येथील रहिवाशांसाठी खालपुर चौक या भागात एक गाव उभे केले आहे आणि या रहिवाशांना अन्न, वस्त्र आणि निवारा या सर्व गोष्टी देण्यात आल्या आहेत. यानंतर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, येथील लोकांना सहा महिन्यात घरे मिळणार आहेत. त्यांना नोकरी देणार आहोत. इतर भरतीमध्ये त्यांना नोकरी दिली जाईल. विशेष बाब म्हणून हे करता येईल. तसेच, आदिवासी विभागाकडून बचत गट देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. २२ अनाथ मुलांची जबाबदारी सरकार घेणार आहे. तसेच, नागरिकांना शेतीसाठी जागा देण्यात येईल. नोकरीसाठी आर्थिक मदत करू आणि ज्येष्ठ महिलांना पेन्शन योजना सुरु करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर असून तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्दच एकनाथ शिंदे यांनी दिला.
तर, माझी तब्येत चांगली आहे. मी इर्शाळवाडीला व्हॅनिटी व्हॅन घेवून आलो नव्हतो. मी चिखल तुडवत वर गेलो, असा टोला शिंदेंनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे. अनेक लोकांची कामे केलीत आणि त्यांचेच आशीर्वाद माझ्या मागे आहे. त्यामुळे मला काही होणार नाही. सरकार स्थापन झाल्यापासून ते पडणार असल्याचे सांगत आहेत. सध्या अनेक जोतिषी तयार झालेत. हे सरकार चांगले आणि महत्वाचे निर्णय घेत आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.