वैद्यकीय शिक्षणामध्ये मला रस होता, पण आमचे नवीन मित्र...; गिरीश महाजनांचे विधान
मुंबई : शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा खातेवाटपाचा तिढा अखेर सुटलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले. त्याबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैद्यकीय शिक्षण यामध्ये मला रस होता. आमचे नवीन मित्र आलेत त्यामुळे त्यांनी खाते मागून घेतले, असे त्यांनी म्हंटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
आधी मंत्रिमंडळ अर्धे होते. त्यामुळे आमच्यावर भार वाढला होता. ग्रामविकाससारखे मोठे खाते माझ्याकडे आहे. परंतु, वैद्यकीय शिक्षण यामध्ये मला रस होता. आमचे नवीन मित्र आलेत त्यामुळे त्यांनी खाते मागून घेतले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन खातेवाटप बाबत निर्णय घेतलाय. नवीन मंत्री आले त्यांच्याकडे आता काही खाती दिली आहेत, असे गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे.
तर, मी माझ्या ग्रामविकास खात्याला जास्तीत जास्त न्याय देईन. अतिशय परिश्रम घेऊन आम्ही 11 मेडिकल कॉलेज जाहीर केलेत. मी माझ्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, अजित पवार गटाच्या शपथविधीनंतर खातेवाटपाच्या हालाचाली सुरु झाल्या होत्या. यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. अजित पवार वजनदार खात्यांसाठी आणि अर्थमंत्री पदासाठी आग्रही होते. परंतु, अर्थ खाते अजित पवारांना देण्यास शिंदे गटातील नेत्यांचा विरोध होता. परंतु, आजच्या खातेवाटपात अखेर अजित पवार अर्थमंत्री पदी विराजमान झाले आहेत.