मल्याळी भाषिकांनी देखील मराठी भाषा शिकावी; राज्यपालांचे प्रतिपादन

मल्याळी भाषिकांनी देखील मराठी भाषा शिकावी; राज्यपालांचे प्रतिपादन

मुंबईतील केरळ ख्रिश्चन कौन्सिलचा वार्षिकोत्सव सोहळा; राज्यपालांनी भूमिका केली स्पष्ट

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मागील काही दिवसांपासून महापुरुषांवरील वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. यावरुन विरोधी पक्षांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली असून महामोर्चाही काढला होता. तसेच, राज्यपाल पदावरुन कोश्यारींना हटवण्याची मागणी करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईतील मल्याळी भाषिकांनी देखील मराठी भाषा शिकावी, असे राज्यपालांनी म्हंटले आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांचे दीक्षांत समारोह मराठी भाषेतूनच संचलित करण्याचा दंडक घालून दिल्याचे राज्यपालांनी सांगितले आहे.

मल्याळी भाषिकांनी देखील मराठी भाषा शिकावी; राज्यपालांचे प्रतिपादन
जेलमधून आल्यापासून राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय; शिंदे गटाचा टोला

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी केरळ ख्रिश्चन कौन्सिलचा ६५वा वार्षिकोत्सव अंधेरीतील कॅनोसा सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला लोकप्रिय मल्याळी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते रेंजी पणिकर, केरळ ख्रिश्चन कौन्सिलचे अध्यक्ष बाबू वर्गिस, महासचिव सायमन वर्की, निमंत्रक बिनु चंडी, ख्रिस्ती धर्मगुरू तसेच परिषदेचे सदस्य तसेच निमंत्रित उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, असं आपण आपल्या उत्तराखंड राज्यातील लोकांना नेहमीच सांगत असतो. तसेच, मुंबईतील केरळी समाजाने देखील मराठी भाषा शिकली पाहिजे. भारतीय भाषा देशाला जोडण्याचे महत्वाचे काम करतात. त्यामुळे प्रत्येकाने मातृभाषेतील शिक्षणाला महत्व दिले पाहिजे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर भर देण्यात आला आहे. सुरुवातीचे शिक्षण मातृभाषेत झाल्यास इतर भाषा शिकणे सुलभ होते, असे सांगून आपण राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने राज्यातील सर्व दीक्षांत समारोह मराठी भाषेतूनच संचलित करण्याचा दंडक घालून दिल्याचे त्यांनी सांगितले.

मल्याळी भाषिकांनी देखील मराठी भाषा शिकावी; राज्यपालांचे प्रतिपादन
घरातील सदस्यांपेक्षा आपल्या ड्रायव्हरला जास्त माहिती असते; असं अजित पवार का म्हणाले?

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर त्यांच्या विधानामुळे टीका होत आहे. अशात त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपल्यावर होत असलेल्या टीकेमुळे आपण दु:खी असल्याचे म्हंटले होते. राज्यपाल होण्यात आनंद नाही आणि या पदावर असण्याचे दु:ख आहे, असेही कोश्यारींनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com