'...तर मला 4 दिवसांत अटक करा, अन्यथा  पीएम मोदींनी माफी मागावी'

'...तर मला 4 दिवसांत अटक करा, अन्यथा पीएम मोदींनी माफी मागावी'

कथित दारू घोटाळ्यासंदर्भात दिल्लीतील राजकारण तापले; मनीष सिसोदिया यांचा भाजपवर हल्लाबोल

नवी दिल्ली : कथित दारू घोटाळ्यासंदर्भात दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने जारी केलेल्या 'स्टिंग व्हिडिओ'नंतर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. अशातच भाजपकडे इतके पुरावे असताना सीबीआयने मला 4 दिवसांत अटक करा, नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

मनीष सिसोदिया म्हणाले की, भाजपने आता हे कथित स्टिंग सीबीआयला द्यावे. सीबीआयने चार दिवसांत चौकशी करावी. याचा सखोल आणि त्वरीत तपास करावा. ही स्टिंग खरी असेल तर चार दिवसांत आज गुरुवार आहे, सोमवारपर्यंत मला अटक करा. अन्यथा, अन्यथा सोमवारी खोटे स्टिंग केल्याबद्दल पंतप्रधानांनी माझी माफी मागावी. हे भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयातून रचले गेलेले षडयंत्र आहे, असे मानावे लागेल, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

सीबीआयने माझ्या जागेवर छापा टाकला, काहीही मिळाले नाही. त्यानंतर लॉकरमध्ये गेले असता तेथेही फक्त मुलाचे खेळणे आढळले. त्यांनी सर्व तपास केला. सीबीआयनंतर ईडीकडे तपास दिल्यानंतर यात काही सापडले नाही. तर त्यांनी स्टिंग आणले आहे. तसेही भाजप ही आजकाल सीबीआयची विस्तारित शाखा आहे, असा टोलाही सिसोदिया यांनी लगावला आहे.

तत्पूर्वी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, आम आदमी पार्टीच्या घोटाळ्याचा स्टिंग व्हिडिओ समोर आला आहे, त्या व्हिडिओमध्ये आरोपी क्रमांक 9 अमित अरोरा याने सर्वांचा पर्दाफाश केला आहे. अमित अरोरा किती पैसे कोणाकडून घेतले आणि हा घोटाळा कसा केला गेला हे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या घोटाळ्याचा पैसा गोवा आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवण्यासाठी वापरला गेला, असा आरोपही त्यांनी केजरीवाल सरकारवर केला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com