वर्ध्यात महायुतीकडे पाच आमदार तरीही भाजपचा दारूण पराभव वर्धा लोकसभेचे खापर कोणाच्या माथी?

वर्ध्यात महायुतीकडे पाच आमदार तरीही भाजपचा दारूण पराभव वर्धा लोकसभेचे खापर कोणाच्या माथी?

कोणाला बसणार धक्का मोदी योगी सभेच्या मतदारसंघात मविआ उमेदवाराला मताधिक्य मतं.
Published by :
Team Lokshahi

भूपेश बारंगे, वर्धा | लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र 2014 पासून मोदींच्या लाटेत वर्ध्यात भाजपचे रामदास तडस मोठ्या मताधिक्य मताने विजयी झाले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे सागर मेघे यांचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा 2019 मध्ये त्यांची लीड घसरली, मात्र चांगल्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार चारूलता टोकस यांचा त्यांनी दारुण पराभव केला होता. 2024 मध्ये रामदास तडस हे हॅटट्रिक मारणार असे सर्वत्र चित्र होते, त्याचं कारणही तसचं होते. भाजपकडे या मतदारसंघात चार आमदार होते. त्यामुळे येथे भाजपचे उमेदवार विजयी होणार असे वाटत होते. त्यामुळे काँग्रेस पक्षातून उमेदवारी घेण्यासाठी कोणी पुढाकार घेतल्याचे दिसत नव्हते. काँग्रेस पक्षात सर्वांचा पराभूत होणार असल्याने त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यामुळे भाजपचे येथे उमेदवार विजयी होणार हे निश्चित मानले जात होते. मात्र ऐनवेळी हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे गेला अन् काँग्रेसचा पंजा सोडून तुतारी हातात घेऊन काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेस SP गटाच्या तुतारी चिन्हावर उमेदवार झाले. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केले. भाजपचे चार आमदार असूनही भाजपला मोठा धक्का बसला असुन पराभवाचा सामना करावा लागला.

वर्धा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. वर्धा,आर्वी, हिंगणघाट, देवळी, मोर्शी आणि धामणगाव असे सहा विधानसभा क्षेत्र असून चार विधानसभेत भाजपचे आमदार आहेत. हिंगणघाटमध्ये समीर कुणावर, आर्वी दादाराव केचे,वर्धा पंकज भोयर आणि धामणगावमध्ये प्रताप अडसड तर मित्र पक्षाचे मोdeeर्शी आमदार देवेंद्र भुयार आहेत असे एकूण महायुतीकडे पाच आमदार आहेत. एकमेव विरोधी पक्ष काँग्रेस देवळी मतदारसंघात आमदार रणजित कांबळे आहेत. एवढं असूनही वर्धा लोकसभेत भाजपचे खासदार रामदास तडस यांचा मोठ्या मताधिक्य मताने पराभूत झाला. भाजपचे उमेदवार रामदास तडस हे स्वतः देवळी विधानसभा क्षेत्रातून येतात. त्यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून 32 हजार मताचा फटका बसला आहे हे विशेष.

भाजपने वर्धा लोकसभा क्षेत्रात विजय मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव सुमित वानखडे यांना वर्धा लोकसभा क्षेत्रांचे प्रमुख करून सर्व सूत्र त्यांच्या हातात देऊन ही लोकसभा विजय मिळवण्याचा प्रयत्न मोठ्या ताकदीने केला. सुमित वानखडे यांच्याकडून भाजप पक्षाचे उमेदवार विजयी होण्यासाठी संपूर्ण ताकद लावून बूथ प्रमुख, वरियास प्रमुख यांच्यासोबत गावागावात जाऊन बैठका घेण्यात आल्या. तरीही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला, हे उल्लेखनीय आहे.

मोदी,योगीच्या सभा झालेल्या मतदारसंघात मतदारांनी नाकारले.

आर्वी, हिंगणघाट मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंगणघाट मतदारसंघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली. मात्र या दोन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या मताधिक्य मताचा फटका बसला. मोदी आणि योगीच्या सभेमुळे भाजपला फायदा होणार असल्याचे चित्र स्पष्ट होते, मात्र येथे मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले. मतदारांनी स्वतः ही निवडणूक हातात घेऊन भाजप पक्षाला दाखवून दिले की, शेतकरी राजा आहे त्याच्यासमोर कोणताही पक्ष मोठा नाही. शेतकऱ्याचं हित बघणाऱ्या पक्षाला शेतकरी मतदान करेल हे शेतकऱ्यांनी पक्षांना दाखवून दिले.

शेतकऱ्याने भाजपावर मतदानातून रोष व्यक्त केला!

ग्रामीण भागात पहिल्यांदा वर्धा लोकसभेत तुतारी चिन्ह पहायला मिळाले. तरीही मतदारांनी भाजपच्या कमळावर नाराजी व्यक्त करत तुतारी चिन्हावर मते मारल्याचे चित्र स्पष्ट झाले. याचे नेमके कारण शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही. बेरोजगार रोजगार नाही, घरगुती गॅस दरवाढ केली. शेतकऱ्याला सहा हजाराचे मानधन नको शेतमालाला भाव द्या, असं या मतदानातून दिसून आले.

कधी न बघितलेलं चिन्ह मतदारांना आवडलं!

वर्धा लोकसभा क्षेत्रात भाजप आणि काँग्रेस हे एकमेकांसमोर रिंगणात उतरत होते. त्यामुळे या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस पक्षात निवडणूक आतापर्यंत येथील मतदारांनी पाहिली होती. त्यामुळे येथे पंजा व कमळ चिन्ह लोकांच्या मनात होते. मात्र मविआ मध्ये हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे गेले आणि येथील चिन्ह बदलले. त्यामुळे मतदारांना नवीन चिन्ह असल्याने भाजपला याचा फायदा होईल असे सर्वत्र वाटत होते. अवघ्या काही दिवसांत तुतारी चिन्ह हे मतदारांच्या लक्षात येईल असं कोणालाही वाटत नव्हतं. मात्र हे चिन्ह नवीन असलं तरी मतदारापर्यंत पोहचवून त्यात विजय प्राप्त केला, हे आश्चर्य म्हणावं लागेल.

कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष पदाचा वचपा तर नाही ना?

कुस्तीगीर परिषदचे शरद पवार हे अध्यक्ष होते. या अध्यक्ष पदावरून राज्यात राजकारण झाले आणि या पदावर वर्धा लोकसभेचे खासदार हे कुस्तीगीर परिषदचे अध्यक्ष झाले. शरद पवार यांना या पदावरून पायउतार करण्यासाठी तडस यांनी मोठा प्रयत्न केला होता. त्यामुळे शरद पवारांना याचा धक्का बसला होता. तोच वचपा काढण्यासाठी चक्क शरद पवार यांनी हा मतदारसंघ स्वतःकडे घेऊन भाजपचे रामदास तडस यांना पराभूत करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे कार्य सोपवले होते. वर्धा लोकसभेच्या निवडणूक कार्यकाळात कुस्तीगीर परिषदचा मुद्दा शरद पवार कोठेही बोलले नसले तरी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी हा शब्द वर्ध्यात उमेदवारी अर्ज भरताना बोलून दाखवला होता. त्यामुळे हा एक मुद्दा शरद पवार यांच्या जिव्हारी लागल्याने रामदास तडस यांची हॅटट्रिक हुकवण्यासाठी शरद पवार यांनी मतदारसंघ स्वतःकडे ठेवून तडस यांना इंगा दाखवल्याचे बोलले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com