...आणि एक दिवस गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल : जयंत पाटील

...आणि एक दिवस गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल : जयंत पाटील

जयंत पाटील यांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी लाख म्हणोत की, महाविकास आघाडी सरकार असताना आमच्यावर अन्याय झाला. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच मुख्यमंत्र्यांनी या खात्याच्या माध्यमातून अनेकांचे 'कल्याण' केले, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी २९३च्या चर्चेवर बोलताना शिंदे सरकारच्या भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली.

...आणि एक दिवस गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल : जयंत पाटील
अखेर ठाण्यातील वादग्रस्त सहायक आयुक्तांचा कार्यभार काढला; उदय सामंतांची सभागृहात घोषणा

महाराष्ट्र शासनाचे नगरविकास खाते हे शासनाच्या कारभारातील अत्यंत महत्त्वाचे खाते आहे. मुख्यमंत्री महोदय स्वतः गेल्या ७-८ वर्षांपासून या खात्याचा कार्यभार हाकत आहेत. याकडे सभागृहाचे लक्ष जयंत पाटील यांनी वेधले. नगरविकास खात्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबई शहर आहे. अनेकांसाठी ही मुंबई पोट भरणारी आहे, अनेकांसाठी ती घर आहे, अनेकांसाठी ती लक्ष्मी आहे, अनेकांसाठी स्वप्न आहे तर अनेकांसाठी माय आहे हेही जयंत पाटील यांनी आवर्जून सांगितले. राज्यात सत्तांतर झाले आणि मुंबई खुल्या तिजोरीसारखी आपल्याला मिळाली, अशी भावना सत्ताधाऱ्यांच्या मनात जागृत झाली आहे, असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला.

मागील मुंबई मनपा निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद या सर्व गोष्टींचा वापर करून शिवसेना मनपा निवडणुकीत चितपट करण्याचा डाव त्यांच्या मित्रांनी आखला होता, असा गौप्यस्फोटही जयंत पाटील यांनी केला. खरंतर इथेच महाविकास आघाडीच्या जन्माची चाहूल लागली हाही खुलासा जयंत पाटील यांनी यावेळी केला. मुंबई महापालिकेकडे काही ठेवी आहेत. त्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा आहे. १२ हजार कोटी रुपये महापालिकेच्या ठेवीमधून काढण्याची तरतूद महापालिकेच्या बजेटमध्ये करण्यात आली आणि पालिकेच्या तिजोरीवर हात मारला गेला, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे या मुंबई शहरावर प्रचंड प्रेम होते. मुंबईची सत्ता भाजपच्या हातात देणे हे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पटले नसते. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे काम होत आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जात आहे, असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण ज्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत त्याप्रमाणे एकेदिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल की काय? अशी भीती जयंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केली. गुजरातला मुंबईविषयी आकस असणे स्वाभाविक आहे. मुंबई गुजरातला मिळाली नाही याचे त्यांना दुःख आहे, असा टोला लगावतानाच या मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करले आहे याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली. मागील २ वर्षांपासून मुंबईसह बऱ्याच महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका का होत नाही याचा अभ्यास करायला हवा असेही जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com