शरद पवारांच्या द्विधा मनःस्थितीने राष्ट्रवादीचे काय होणार?

शरद पवारांच्या द्विधा मनःस्थितीने राष्ट्रवादीचे काय होणार?

शरद पवार.....! राजकारणातले चाणक्य.
Published by  :
Team Lokshahi

सुनील शेडोळकर

शरद पवार.....! राजकारणातले चाणक्य. अर्ध शतकाहून अधिक काळ संसदीय राजकारणात दबदबा निर्माण करणारं नेतृत्व म्हणून जवळपास सर्वच राजकीय पक्षांत अगदी सहजतेने ऊठबस असणारे मोठे नेते. जवळपास 35 ते 40 वर्षांपासून दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसाठी नेहमीच मध्यवर्ती भूमिकेत असणारे हक्काचे नेते अशी ज्यांची ओळख असून दिल्ली व राज्यात कमी जागा निवडून येऊनही सत्तासमीकरणात ममत्व ठेवून कुणाचे सरकार बनवायचे अन् कुणाचे बिघडवायचे याचे तंतोतंत आकलन असणारे मांडणीकार म्हणून सर्वच राजकीय पक्षांना शरद पवारांबाबत कमालीचे आकर्षण असते. आपल्या पक्षाचे गेल्या पंचवीस वर्षांत 10 खासदारही निवडून न येताही केंद्रातील राजकारणात दबदबा निर्माण करण्यात शरद पवारांनी नेहमीच यश मिळवले आहे. विकोपाचे राजकीय मतभेद होऊन ही सत्तेचे सूर जुळवण्यासाठी दोन पावलं मागे येण्याचे राजकारणात आवश्यक असणारे व्यवहारिक शहाणपण ही शरद पवारांच्या आजवरच्या राजकारणातील जमेची बाजू असून त्यांच्याकडून हा गुण अन्य राजकीय पक्षांनी शिकण्यासारखा आहे. राजकारणात असूनही राजकारणाबाहेरील लोकांशी संपर्क बनवून ठेवणे किंवा राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून त्यांच्यात अगदी सहजपणे वावरणे हे शरद पवारांचे आणखी एक वैशिष्ट्य त्यामुळेच सत्तेत असो वा नसो सर्वच क्षेत्रांतील मोठमोठ्या लोकांचे घोळके आपल्या आसपास ठेवण्यात शरद पवारांना नक्कीच यश मिळाले असे म्हणता येईल. आजच्या वर्तमान स्थितीत कोणाचेही कुठलेही काम असल्यास ते हमखास करून देण्याची खात्री बाळगण्याची हक्काची जागा म्हणजे शरद पवार असाही लौकिक पवारांना प्राप्त आहे, म्हणूनच पवार जातील तेथे सर्वच वयाचे लोक त्यांना आवर्जून भेटायला येतात ही वस्तुस्थिती आहे.

राजकीय आडाखे बांधण्याचे आणि बांधलेले खऱ्यात उतरविण्याची दूरदृष्टी व आकलनशक्ती ही पवारांकडे अन्य राजकीय पुढाऱ्यांपेक्षा अधिक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आघाड्यांच्या राजकारणाचा खूप मोठा कालखंड देशातील सर्वपक्षीय राजकारण्यांना मिळालेला असल्याने नवनवे मित्र जोडणे आणि त्या माध्यमातून राजकीय सोयरीकी करण्याचा बक्कळ अनुभव शरद पवारांना असल्याने ही काही राजकीय पक्ष त्यांच्याशी दोस्ती करताना तर काही राजकीय पक्ष चार हात दूर राहण्याच्या कसरती करताना दिसतात. आघाड्यांच्या राजकारणात सत्तेचे त्रैराशिक मांडण्यात शरद पवारांचा मोठा हातखंडा त्यांचे राजकीय विरोधक ही मान्य करताना दिसतात. राजकारणात विरोधात असतानाही सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचे औदार्य शरद पवारांनी अनेक वेळा दाखविले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे शीर्ष नेतृत्व शरद पवारांना आपलेसे करतात. त्यामुळे 13 दिवसांत अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडण्यासाठी सर्व विरोधकांसोबत असणाऱ्या शरद पवारांना त्याच अटलबिहारी वाजपेयी यांच्या एन डी ए सरकार मध्ये आपातकालीन व्यवस्थेचे प्रमुख पद देताना लातूर भूकंपात पवारांनी केलेल्या कामाचा हवाला दिला व पवारांनीही तो स्वीकारला त्यामुळे सर्वपक्षीय राजकीय किनार राखणं हे शरद पवारांच्या राजकारणाचे आणि एक वैशिष्ट्य म्हटले पाहिजे.

देशातील आघाडीच्या राजकारणातील तीन दशकांची मक्तेदारी मोडून 2014 साली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होत भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार आणण्याचे पक्ष स्थापनेपासून चे स्वप्न पूर्ण केले. मोदींची काम करण्याची पद्धत ही पहिल्या टर्ममध्ये विरोधकांच्या तेवढी लक्षात आली नसावी. पहिले तीन - साडेतीन वर्षे दिल्लीतील बाबूंनी नरेंद्र मोदींना जम बसवू देण्यास शक्य तेवढा छुप्या पद्धतीने काॅंग्रेस चा अजेंडा चालविण्याचा प्रयत्न केला, शेवटच्या दीड एक वर्षांत गुजरात केडरने पीएमओत आपले बस्तान बसवायला सुरुवात केली त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत मोदी विरुद्ध गांधी असा सामना रंगवण्यात आला. काॅंग्रेस ने व खास करून राहुल गांधी यांचे मोदींच्या विरोधातील निगेटिव्ह कॅम्पेन काॅंग्रेस वर उलटवीत मोदींनी 2019 चे मैदान पूर्वीपेक्षा जास्त संख्याबळ मिळवून मारले. त्या वेळी काॅंग्रेस ला म्हणावी तशी अन्य मोदींविरोधकांची साथ मिळाली नाही. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितीशकुमार, शरद पवार ही सर्व मंडळी मूळ काॅंग्रेस पासूनच त्यांचाच जनाधार घेऊन वेगळी झालेली असल्याने मोदींना म्हणावा तेवढा विरोध झाला नाही, पण 2019 नंतर मोदींनी एकापाठोपाठ एक घेतलेल्या काही निर्णयांमुळे काॅंग्रेस शिवाय अन्य विरोधकांना धडकी भरली. काश्मीर मधील 370 कलम रद्द करणे, तोंडी तीन तलाक रद्द करणे व राम मंदिराचा निकाल हे तीन निर्णय मोदी विरोधकांसाठी जवळीक वाढविण्यास पुरेसे ठरले. समान नागरी कायद्याचा निर्णय ही 2024 पूर्वी लागण्याची चिन्हे दिसत आहेत त्यामुळे नरेंद्र मोदींना मैदान सोपे जाऊ नये या मानसिकतेतून काॅंग्रेस सोबत येणारे मोदी विरोधकही वाढत गेले. 2019 ते 2021 या तीन वर्षांत प्रमुख विरोधी पक्षांना हदरविण्याचा प्रयत्न मोदी - शहा जोडीकडून झाले. 2019 मध्ये पश्चिम बंगाल मधून भाजपचे 17 खासदार निवडून आणून ममता बॅनर्जी यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले. 2021 मध्ये ममतांनी बंगालचा गड कसाबसा राखला तरी त्या स्वतः पराभूत झाल्या. 2017 मध्ये पुन्हा भाजपशी जुळवून घेणे बिहार मध्ये नितीशकुमार यांना महागात पडले. 2020 च्या निवडणुकीत नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढविली, पण निवडणूक निकालानंतर नितीशकुमार यांचा पक्ष राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला तरीही भाजपने नितीशकुमारांना मुख्यमंत्री केले. चिराग पासवान यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप चाप ओढत असल्याची जाणीव होताच नितीशकुमारांनी पुन्हा लावू यादवांसोबत राजकीय संसार थाटला तर 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेऊन लोकसभा जिंकली. जागावाटपात उद्धव ठाकरे यांना फडणवीसांनी जेरीस आणले. विधानसभेतही फडणविसांनी कुरघोडी केल्याची सल डोक्यात ठेवून विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही आकडेमोड आपल्या बाजूने जणू शकते याची खात्री पटल्यावर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचा हात पकडून काॅंग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवले. त्यानंतरच्या महाराष्ट्रातील राजकीय ड्राम्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. कर्नाटक व मध्य प्रदेश मध्ये मोडतोड करून सत्ता मिळवली, पण महाराष्ट्रात शरद पवार नावाच्या चाणक्याने धोबीपछाड देत नवख्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करत संपूर्ण राज्याचा रिमोट आपल्याकडे घेतला आणि भारतीय जनता पक्षाने ध्रुवीकरणाच्या राजकारणाला फोडाफोडीसोबत धाकदपटशा चा मार्ग अवलंबला.

महाराष्ट्रात 2019 साली उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले. अचानक आलेल्या राजकीय परिस्थितीत फासे उलटे पडल्यानंतर सरकारला नामोहरम करण्यासाठी दोन कलमी कार्यक्रम भाजपकडून आखण्यात आला. देवेंद्र फडणवीस या धूर्त राजकारण्याने विधानसभा सांभाळली तर ईडी सीबीआय व इनकम टॅक्स यांची कमान अमित शहा यांनी सांभाळली. ज्या शरद पवारांना दोन दोन टर्ममध्ये पूर्ण बहुमत मिळवूनही नरेंद्र मोदी यांनी आपले राजकीय गुरू म्हणून गोंजारायचा प्रयत्न केला त्याच शरद पवारांनी उद्धव ठाकरेंसाठी भारतीय जनता पक्षाला आव्हान दिल्याची सल अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना होतीच. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी काॅंग्रेस चा पाठिंबा मिळत नसताना पवारांनी पहाटेचा शपथविधी चा डाव मांडला, मोडलेला डाव काॅंग्रेस च्या निर्णय न करण्याचे कारण सांगून काॅंग्रेस चा बिनशर्त पाठिंबा महाविकास आघाडी ला घेऊन सरकार स्थापले. 2014 ते 2019 चा देवेंद्र फडणवीस यांचा कारभार शरद पवारांना अस्वस्थ करणारा होता. फडणवीसांची महाराष्ट्रातील राजकारणाची पद्धत शरद पवारांच्या अस्तित्वास आव्हान देऊ शकते असा पवारांचा पक्का समज झाल्यानेच पवारांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिवाचे रान केले होते. पावसातील सभा त्यांच्यासाठी फलदायी ठरली आणि निवडणूक निकाल वेगळी आकडेमोड करणारी ठरली व केवळ देवेंद्र फडणवीस यांचा धसका पवारांना महाविकास आघाडी बनविण्यासाठी कारणीभूत ठरली. ज्या त्वेषाने देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता उभा केला तोही उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवारांना जास्त आव्हानात्मक दिसत होते. राज्याचा गृहमंत्री जेलमध्ये जाणे हे कुठल्याही सरकारसाठी मोठी नाचक्की ठरणारी बाब असते, त्या पाठोपाठ नवाब मलिक यांनाही जेलमध्ये टाकून भाजपने उद्धव ठाकरे व शरद पवार या दोघांनाही आव्हान दिले होते. उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ही महाविकास आघाडी सरकार ची सर्वात मोठी चूक होती हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सांगितल्यावरच भारतीय जनता पक्षाने व देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडे आपला मोर्चा वळवला. नरेंद्र मोदींना विरोध करुन काय साध्य होणार असा खडा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केल्यावरच पवारांनी अध्यक्षपद सोडण्याचे ठरवले होते. ज्या काॅंग्रेस पक्षाने दोन दोन वेळा शरद पवारांना पक्षातून काढले त्या काॅंग्रेस साठी मोदींना विरोध करायचा हे अजित पवारांना मान्य नव्हते. उद्या मोदी विरोधकांची लोकसभेत संख्या जास्त झाली तरीही काॅंग्रेस शरद पवारांना कधीच पंतप्रधान करणार नाही असा अजित पवारांचा दावा होता आणि म्हणूनच ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये गेले. शरद पवारांची त्यामुळे मोठी गोची झाली आहे. शरद पवारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांमागेच जाणार हे शरद पवार ही जाणून आहेत म्हणूनच बंडखोरी झाली नाही व अजित पवार हे आमचे नेते आहेत असे शरद पवारांना सांगावे लागत आहे. जे नुकसान फडणवीस यांनी शिवसेनेचे व उद्धव ठाकरे यांचे केले आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस चे ही होऊ शकते हे शरद पवार जाणून आहेत म्हणूनच दुहेरी वक्तव्य करुन ते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2024 ला पुन्हा नरेंद्र मोदींना सत्ता मिळणार असे शरद पवार खाजगीत मान्य करत आहेत पण इंडिया आघाडी सोबत राहून दोन्ही डगरींवर ते हात ठेवत आहेत. राहुल गांधींची लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यामुळे इंडिया आघाडी ला बळ मिळाले होते. केजरीवाल, ममता, नितीशकुमार व शरद पवार हे पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असल्याने लपून राहिलेले नाही. पण आता राहुल गांधींच्या वापसीने राजकीय समीकरणे बदलणार आहेत त्यामुळेच शरद पवार हे मोदींशीही संबंध ठेवून आहेत. अशा या द्विधा मनःस्थितीने राष्ट्रीय काय होणार हा सवाल आहे. प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष करताच त्यांनी मोदींशी गुजराती सूत जमवत अजित पवारांना 40 आमदारांसोबत भाजपसोबत नेले. शरद पवारांनाही पटेल घाट घालत आहेत, बघूयात शरद पवार हे मोदींच्या गळाला लागून इंडिया आघाडीला दुबळी करतात का स्वाभिमान जपत सत्तेला लाथ मारुन राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा नव्याने उभारणी करत आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवितात.... पाहूया 1 सप्टेंबर च्या मुंबईतील बैठकीत शरद पवारांची द्विधा मनःस्थिती कोणते पत्ते उघडते.....!

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com