उद्या सत्तासंघर्षाचा फैसला; एकनाथ शिंदेंनी बोलवली महत्वाची बैठक
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय उद्याच निकाल देणार आहे. 16 आमदार पात्र ठरणार की अपात्र ठरणार याचा फैसला उद्या होणार आहे. या निकालाकडे राज्यासह देशाचेही लक्ष लागले आहे. यामुळे राजकीय घडामोडींना आता वेग आला असून सत्ताधारी-विरोधकांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेत्यांची महत्वाची बैठक बोलवली आहे. निकालावर महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे आणि 16 आमदारांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने महत्वपूर्ण टिप्पणी नोंदवल्या होत्या. तर, राज्यपालांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी अंती निकाल राखून ठेवला होता. अखेर सत्ता संघर्षाच्या निकालाची उद्या घोषणा होणार आहे. या निकालावर राज्य सरकारचे भवितव्य अवलंबून असेल. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल लागल्यास 16 आमदारांची कारकीर्द धोक्यात येणार आहे.
या पार्श्वभूमी शिंदे गटाच्या गोटात घडामोडींना वेग आला असून एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण बैठक बोलवली आहे. शिंदे गटाच्या सर्व नेत्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. उद्याची काय प्रतिक्रिया असणार यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर, सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत एकनाथ शिंदेंना विचारले असता त्यांनी हात जोडून सर्वांना शुभेच्छा म्हणत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यामुळे आजच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे जर अपात्र झाले तर त्यांना मुख्यमंत्री राहता येत नाही. आणि मुख्यमंत्री राहिले नाही तर सरकार पडते, असे मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे. तसेच, नवीन कोणाला बहुमत आहेत का? हे राज्यपाल पाहतील. परंतु, ते सध्या कुणाकडेच नाहीयं. अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू होते. आणि सहा महिन्यांमध्ये निवडणुका लागू शकतील, असेही त्यांनी सांगितले आहे. परंतु, एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला तर त्यांच्या जागेवर दुसरा बसवून बहुमत टिकू शकेल, असेही बापटांनी स्पष्ट केले आहे.