ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करून वातावरण बिघडवू नये; जरांगेंचे विधान
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करून वातावरण बिघडवू नये, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांवर बोलायचं नाही, काय होईल ते पुढे पाहू, असंही म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या डेडलाईनबाबत बोलताना जरांगे यांनी तारखेत कुठलाही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं. सोबतच मराठा आरक्षणासाठी 15 डिसेंबरपासू सुरू होणार्या दौऱ्याला जर कुणाचा आक्षेप असेल तर ती शोकांतिका असल्याचा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांना आज हॉस्पिटमधून डिस्चार्ज मिळाला आहे. यावेळी ते म्हणाले की, सुट्टी झाली तरी घराकडे जाणारं नाही. दिवाळी साजरी करणार नाही. वैयक्तिक दिवाळी न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेटलो, असे सांगून ते पुढे म्हणाले, तुम्ही आत्महत्या का करता? मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आत्महत्या होत असल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सगळ्यांना आरक्षण मिळणार आहे. तुम्ही आत्महत्या करू नये. शांततेत आंदोलन करण्यासाठी तयार रहा, असे आवाहन त्यांनी केले.
मी शांततेत जातो आणि गाठीभेटी घेतो आणि आशीर्वाद घेतो. उद्रेक करणारे कोण हे सरकारला समजले आहे. आमच्या गाठीभेटीला सरकारचा आक्षेप असेल तर यापेक्षा दुसर दुर्दैव काय? मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगितले होते की तुम्हाला शिष्टमंडळ प्रमाणपत्र देणार. मात्र 14 तारखेला पाहू. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर धनगर आरक्षण आणि इतर आरक्षणासाठी लढणार असल्याचेही मनोज जरांगेंनी म्हंटले आहे. तुमचे नेते आंदोलन करणाऱ्यांवर बदला घेण्याचा प्रयत्न करत असेल तर नेत्यांविरुद्ध राज्यातलं मराठा एकत्र आणू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.